ठाणे : हिरानंदानी मेडोज येथील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी रस्त्यालगत वाहने उभी करण्यासाठी नवे नियम लागू केले आहे. गेल्याकाही दिवसांपासून या चौक परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडींमुळे नागरिक त्रस्त आहेत.
डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौकात हिरानंदानी मेडोज, वसंत विहार, टिकूजीनी वाडी, पवार नगर येथील वाहनांची वाहतुक सुरु असते. या भागात नागरिकरण वाढल्याने अनेकदा रात्रीच्या वेळेत चौक आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुक कोंडी होते. या बाबतच्या तक्रारी ठाणे वाहतुक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहने उभी करण्याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.
डाॅ. काशिनाथ घाणेकर चौक ते जेमिनी इमारत चौका पर्यंत पी-१ आणि पी-२ अशी रचना करण्यात आली आहे. तसेच जेमिनी इमारत चौक ते सुर्या टाॅवर पर्यंत दोन्ही बाजूस समांतर वाहने उभी करण्यास परवानगी असेल. तर, सुर्या टाॅवर ते डीएव्ही शाळा असा ३०० मीटर परिसरापर्यंत वाहने उभी करण्यास मनाई असणार आहे. हे नियम दिवसभर लागू राहतील असे पोलिसांनी स्पष्ट केले.