ठाण्यातील उड्डाणपुलांच्या कामांना पोलिसांची परवानगी नाही; वाहतूककोंडीवर पर्याय शोधण्याचा सल्ला
ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी मीनाताई ठाकरे चौक, अल्मेडा आणि गोखले अशा तीन महत्त्वाच्या मार्गावर आखण्यात आलेल्या उड्डाणपुलांच्या कामांना कधीही सुरुवात होईल असे चित्र दिसत असतानाच या कामामुळे आधीच कोंडीत सापडलेले ठाणेकर कोंडीच्या चक्रव्यूहात अधिक अडकतील, अशी भीती खुद्द वाहतूक पोलिसांमध्येच व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे पुलांची कामे सुरू करण्याआधी वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी आखावयाच्या उपायांची आधी तजवीज करा, अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून महापालिकेस जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच मुख्य जंक्शनवर होणारी कामे एप्रिल आणि मे या सुट्टीच्या महिन्यातच केली जावीत, असा दंडकही पोलिसांकडून घातला जाऊ शकतो. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव वाहतूक विभागाने पोलीस आयुक्तांकडे पाठविला आहे.
ठाणे शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने आखला आहे. नौपाडा, हरिनिवास, गोखले मार्ग, राम मारुती मार्ग या रस्त्यांवर हे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. मात्र, मुळात हे रस्ते अतिशय अरुंद आहेत. त्यातच त्यावर उड्डाणपूल उभारल्यास येथील वाहतुकीचा मार्ग मोकळा होण्याऐवजी अधिक कोंडीचा होणार आहे. त्यातही उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असताना होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अद्याप पर्याय निघू शकलेला नाही.
नेमके याच मुद्दय़ावर बोट ठेवत ठाणे वाहतूक पोलिसांनी या कामास अद्याप परवानगी दिलेली नाही. ही परवानगी देण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. त्यात कच्च्या रस्त्यांचे रुंदीकरण, बॅरेकेडिंग, फलक, वार्डन नेमणे आदी अटींचा समावेश आहे. पुलांची कामे सुरू करण्याआधी शहरात वाहतूक कोंडी होणार नाही, याची आधी तजवीज करा आणि त्यानंतरच परवानगी देण्यात येईल, अशी अटही घालण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
उन्हाळ्याच्या सुट्टीत कामे पूर्ण करा..
एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळा बंद असतात. तसेच अनेक नागरिक सुट्टीनिमित्ताने मूळ गावी जातात. त्यामुळे शहरातील वाहनांचा राबता काहीसा कमी असतो. त्यामुळे या सुट्टीच्या कालावधीत उड्डाणपुल उभारणीचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात यावे, अशी सूचनाही वाहतूक पोलिसांनी प्रस्तावामध्ये केली आहे.
