ठाणे : गेले अनेक वर्षे जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटात असलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाची भिस्त यंदाही अनुदानावरच असल्याचे शुक्रवारच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेकडे परिवहन उपक्रमाने यंदाच्या वर्षी ५७१ कोटी ३३ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. परंतु कर वसुलीत पिछेहाट झाल्याने राज्य शासनाच्या अनुदानावर अवलंबून असलेली पालिका हे अनुदान देऊ शकेल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून ठाणे महापालिकेने परिवहन उपक्रम सुरू केला. ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम चालविण्यात येत असून गेले काही वर्षे हा उपक्रम आर्थिक संकटांचा सामना करित आहे. या उपक्रमाच्या माध्यातून दरवर्षी पालिकेकडे अनुदानाची मागणी करण्यात येत असून हि परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पात कायम असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरेे यांनी २०२५-२६ या वर्षाकरीता ८९५ कोटी ३५ लाखांचा अर्थसंकल्प शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सादर केला. त्यात ५७१ कोटी ३३ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात राज्य सरकारने महापालिकेला ९१४ कोटी रुपयांचे भरीव विकास अनुदान दिले. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात अजून २०० कोटी अशाच अनुदानापोटी जमा होतील अशी महापालिकेला आशा आहे. असे असले तरी उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता, पाणी पुरवठा, जाहिरात आणि शहर विकास विभागांकडून कर वसुलीत पिछेहाट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात अपेक्षित धरण्यात आलेले महसुली उत्पन्ना २३४ कोटी रुपयांनी घट होईल असा अंदाज आहे. याशिवाय, महापालिकेवर सध्या ११८४ कोटींचे दायित्व आहे. यंदाच्या वर्षातही ६१२ कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासनाकडून मिळेल, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. एकूणच राज्य शासनाच्या अनुदानावर अवलंबून असलेली पालिका हे अनुदान देऊ शकेल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

नव्या विद्युत बसगाड्यांचा संकल्प

पुणे येथील सेंट्रल इन्स्टीट्युट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार १ लाख लोकसंख्येस ३० बसगाड्या असणे आवश्यक आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे शहरात सुमारे ७५० आणि १० राखीव अशा एकूण ८२५ बसगाड्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ठाणे परिवहनच्या ताफ्यात ४५३ बसगाड्या असून त्यापैकी ३६३ बसगाड्या प्रवासी वाहतूकीसाठी उपलब्ध होत आहे. यामुळे बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पीएम ई बस योजनेतून १०० आणि केंद्र शासनाच्या एनसीएपी योजनेतून १६० अशा २६० विद्युत बसगाड्या वर्षभरात उपलब्ध होतील, असा दावा परिवहन प्रशासनाने अर्थसंकल्पात केला आहे.