ठाणे : केंद्र शासनाच्या अमृत २.० अंतर्गत इंदिरानगर येथील जुन्या संपचे तोडकाम करून नवीन संप आणि जलकुंभ बांधण्याच्या कामाकरीता जुन्या संप मधील पंपाचे पॅनल बदलीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे केंद्र शासनाच्या अमृत २.० पॅकेज २ अंतर्गत जुन्या संपचे तोडकाम करून त्या ठिकाणी नवीन संप व जलकुंभ बांधण्याच्या कामाकरीता जुन्या संप मधील पंपाचे पॅनल शिफ्टींगचे काम करणे आवश्यक असल्याने मंगळवार, दि.०७/१०/२०२५ रोजी सकाळी ९:०० ते बुधवार, दि.०८/१०/२०२५ रोजी सकाळी ९:०० वाजे पर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रूपादेवी जलकुंभ, रूपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर वायुदल जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ अंतर्गत परिसर इत्यादी भागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे महापालिकेने स्पष्ट केले. या कालावधीत पाणी जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.