ठाणे – ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी छताची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना पावसाळ्यात ओलाव्यापासून आणि उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी हे छत उपयुक्त ठरते. मात्र, काही दिवसांपासून या छताखाली गर्दुल्यांनी आपल्या निवाऱ्याच ठिकाण म्हणून वापर सुरू केला असल्याचे दिसत आहे. प्रवासी रांगेत असताना देखील हे गर्दुल्ले त्या ठिकाणी झोपलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी असुरक्षितता निर्माण झाली आहे.
ठाणे शहरात तसेच त्यापलीकडील शहरांमध्ये कामानिमित्त लाखो प्रवासी प्रवास करत असतात. शहरातील नौपाडा, वागळे इस्टेट, घोडबंदर, ढोकाळी अशा विविध भागात अनेक काॅल सेंटर, आयटी कंपन्या तसेच लघु उद्योजक कार्यालये आहेत. यामुळे ठाणे शहरात नेहमी कामानिमित्त कल्याण, डोंबिवलीसह इतर भागातील अनेक नोकरदार येत असतात. त्याचबरोबर ठाणे शहरातील अनेक नागरिक मुंबई, नवी मुंबई शहरातील कंपन्यांमध्ये काम करतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची दिवस – रात्र वर्दळ सुरूच असते.
या प्रवाशांना तात्काळ रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर म्हणजेच सॅटीस पूलाखाली रिक्षा थांब्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. या थांब्यावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी मीटर रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असतात. यामुळे प्रवाशांना सहज मीटर रिक्षा पकडून इच्छितस्थळी प्रवास करता येतो. दररोज या थांब्यावर सकाळ सायंकाळच्यावेळी प्रवाशांची लांबच लांब रांग लागलेली असते. प्रत्येक प्रवाशाला रिक्षा मिळावी तसेच नियोजन पद्धतीने जाता यावे यासाठी या ठिकाणी लोखंडी अडथळे लावण्यात आलेले आहे. या अडथळ्यांमध्ये प्रवासी रांगेत उभे असतात. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या थांब्यावर छप्पर देखील आहेत. मात्र, या छताखाली गर्दुल्यांनी आपल्या निवाऱ्याच ठिकाण म्हणून वापर सुरू केला असल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले वावर असल्याचे दिसत होते. भिक्षेकरी रेल्वे फलाटावर, स्थानक परिसरात प्रवाशांची वाट अडवून त्यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे दिसत होते. तसेच गर्दुल्यांकडून स्थानक परिसरात झोपणे, अस्वच्छता पसरविण्याचे चित्र होते. परंतु आता या गर्दुल्यांनी स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा थांब्यांचा आधार घेतला आहे.
प्रवासी रिक्षासाठी लोखंडी अडथळ्यांमध्ये रांगा लावतात त्याच अडथळ्यांच्यामध्ये हे गर्दुल्ले झोपत आहेत. प्रवाशांच्या रांगा लागलेल्या असतानाही छताखाली हे गर्दुल्ले झोपल्याने प्रवाशांना उभे राहणे अवघड होते. तिथे वास, अस्वच्छता आणि भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे. हा प्रकार मागील काही दिवसांपासून दिसत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ठाणे स्थानक परिसरा बाहेर असलेल्या रिक्षा थांब्याजवळील गर्दुल्यांवर कारवाई केली जाईल. – भरत चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर पोलीस ठाणे