किशोर कोकणे

ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरे गेल्या काही वर्षांपासून अजस्र अशा वाहन कोंडीत सापडली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी या शहरांमधील असा एकही प्रमुख मार्ग नाही, जो वाहतूक कोंडीमुक्त आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी या काळात केली आहे. या कामांमुळे सुरू असलेली खोदकामे, खड्डय़ांची झालेली दैना यांमुळे प्रवाशांपुढील त्रास आणखी वाढला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गेल्याकाही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मुंबईपेक्षा कमी किमतीमध्ये आणि मुंबईपासून अवघ्या ५०-१०० किलोमीटर अंतरावर घरे मिळत असल्याने ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अनेकांनी त्यांच्या हक्काचा निवारा विकत घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील लोकसंख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या नागरीकरणासोबत वाहनांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक पुरेशी नसल्याने प्रत्येक कुटुंबामागे किमान तीन वाहने झाली आहेत. याचा भार आता रस्ते मार्गावर येऊ लागला आहे. या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे जिल्ह्य़ातील घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्ग, कल्याण-शिळफाटा, मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दिवस रात्र वाहतूक कोंडीत अडकत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दररोज ठाण्याची हद्द पार करण्यासाठी एक ते दोन तास लागतात. मुंबईपेक्षा जवळ असूनही अरुंद रस्ते, खोदकामे आणि खड्डे यांमुळे वाहनचालकांसाठी मुंबई प्रवास नकोसा झालेला आहे. हा प्रवास वाहनचालकांना नकोसा होण्यामागे अपूर्ण प्रकल्प जबाबदार आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

नव्या ठाण्यातील वाहतुकीची धमनी ठरलेल्या घोडबंदर मार्गावरून दिवसाला ६० हजारहून अधिक वाहने ये-जा करत असतात. याच मार्गावरून भिवंडीहून गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांचीही वाहतूक होत असते. दोन वर्षांपासून या मार्गावर मेट्रोच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध ‘एमएमआरडीए’ने अडथळे उभारले आहेत. हा रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. तर, दुसरीकडे ठाणे महापालिकेनेही मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी सेवा रस्ता खोदले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने येथील रस्ते व्यवस्थित केलेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण सेवा रस्त्याची चाळण झालेली आहे. मेट्रो आणि सेवा रस्ते यांची रखडलेली कामे यांमुळे दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी उड्डाणपूलही अत्यंत अरुंद आहे. तीन वर्षांपासून या पुलाचे काम रेल्वे आणि एमएमआरडीएकडून सुरू आहे. एमएमआरडीए त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या दोन वाहिन्यांचे काम २०२१ च्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. असे असले तरी या मार्गाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या रेल्वेने त्यांच्या पुलाच्या बांधकामाला अद्यापही सुरुवात केली नाही. त्यामुळे हा कोपरी पूल रुंदीकरणाच्या प्रकल्पाचा केवळ पहिला टप्पाच २०२१ मध्ये पूर्ण होणार आहे.

कल्याण-शिळफाटा हा मार्ग दिवा ते बदलापूर आणि त्यापुढील शहरांत राहणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच मार्गावरून अवजड वाहतूक होत असते. दररोज लाखो खासगी वाहने या मार्गावरून धावत असतात. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामाला तीन वर्षे लागणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका अभियंत्याने सांगितले. त्यामुळे पुढील तीन वर्षे नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागणार आहे. अशाचप्रकारे मानकोली-मोठागाव हा प्रकल्प भूसंपादनाच्या कामामुळे रखडला आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या मानकोली उड्डाणपुलाचे काम मार्च २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यास कल्याण-शिळफाटा आणि भिवंडी बाह्य़वळण मार्गावरील भार हलका होऊन वाहतूक कोंडी टळणार आहे.

पत्रीपूल आणि दुर्गाडीपुलाचे बांधकामही २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे दररोज या मार्गावरील वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू ठेवावी लागत आहे. दररोज वाहनचालकांना या पुलावर अर्धा ते पाऊण तास अधिकचा घालवावा लागत असून इंधनही मोठय़ा प्रमाणात जळत असते.

बदलापूर आणि अंबरनाथ भागातही हीच परिस्थिती आहे. बदलापूर-कल्याण या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनधिकृत बांधकामे हटविणे शक्य न झाल्याने सात वर्षे रखडलेले आहे. हा रस्ता औद्योगिक कंपन्या आणि बदलापूरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

तसेच कल्याण-काटई-कर्जत हा मार्गही अत्यंत महत्त्वाचा आहे. तीन प्राधिकरणांकडे हा रस्ता असल्याने दुरुस्तीसाठी टोलवाटोलवी सुरू असते.

‘रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत’

कल्याण डोंबिवली भागाला दिलासा देणारा ऐरोली-काटईनाका रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प सध्या याच्या भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. १२ किलोमीटरचा हा रस्ता असून प्रकल्प पूर्ण झाल्यास डोंबिवली ते ऐरोली अवघ्या १५ मिनिटांत वाहनचालकांना गाठता येणार आहे. तर, एमएसआरडीसीकडून आणखी नवे प्रकल्प या मार्गावर तयार करण्याचा प्रयत्न आहे. या कामांच्या घोषणा होत असल्या तरीही रखडलेली कामे पूूर्ण व्हावीत, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.