ठाणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इतिहासकालीन अनेक तलाव आहेत. या तलावांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेमार्फत या तलावांच्या संवर्धनासाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेची नेमणूक केली जाणार असून त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा प्रकल्प राज्य शासनाच्या सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत राबविला जाणार असून पहिल्या टप्प्यात दहा तलावांची कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.
ठाणे शहर जसे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील इतिहासकालीन अनेक तलाव असल्याचे पाहायला मिळते. या तलावांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी राज्य सरोवर संवर्धन योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून शहापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यातील १६ तलावांचे प्रस्ताव पुढे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३ तलावांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तलावांचे सुशोभिकरण केले जाणार असून ५० ते ५५ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. या कामाकरिता जिल्हा परिषदेमार्फत प्रकल्प व्यवस्थापन संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी निविद प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली.
तलावांचे संवर्धन कसे केले जाणार
ठाणे ग्रामीण भागातून या योजनेसाठी एकूण १६ तलावांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी १३ तलावांच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील दहा आणि अंबरनाथ तालुक्यातील तीन तलावांचा समावेश आहे. तलावातील गाळ काढणे, तलावा भोवती उद्यान, वृक्ष लागवड करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, चालण्याचा मार्ग (वॉकिंग ट्रॅक) बनविणे, संरक्षक भिंत उभारणे अशी कामे या प्रकल्पात केली जाणार आहेत.