वारंवार सांगूनही पत्नी घरी राहण्यास येत नाही. ती विभक्त राहते, त्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीला फळांच्या रसातून विषारी द्रव्य पाजवल्याची घटना डोंबिवलीमधील विष्णुनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.अंजली असे पत्नीचे नाव असून कृष्णकांत पांडे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. विषारी द्रव्य शरीरात भिनल्याने पत्नीची प्रकृती चिंताजनक झाली आहे. तिच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- अश्रुधूर नळकांड्यांच्या धुरामुळे डोंबिवलीतील इंदिरानगरमध्ये घबराट; ठाकुर्लीतील रेल्वे सुरक्षा जवानांचा सराव प्रशिक्षण कार्यक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृष्णकांत मुंबईत राहतो. तर पत्नी अंजली त्याच्यापासून विभक्त राहते. वारंवार सांगूनही अंजली नांदायला येत नसल्याने कृष्णकांत संतप्त होता. अंजली काम करत असलेल्या पश्चिम डोंबिवलीतील कार्यालयाच्या ठिकाणी कृष्णकांत आला. त्याने अंजलीला ऑफीसबाहेर बोलावले. थांब मी आत्ताच तुला मारून टाकतो, अशी त्याने धमकी दिली. सोबत आणेलेले रासायनिक द्रव्य मिसळलेला फळांचा रस  कृष्णकांतने अंजलीला जबरदस्तीने पाजला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. विषारी द्रव्य मिश्रित रस पोटात गेल्याने अंजलीची प्रकृती गंभीर बनली. तिच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कृष्णकांतला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वडणे तपास करत आहेत.