कांदापात वगळता सर्व पालेभाज्यांचे दर आवाक्यात

गेल्या महिन्यात अवेळी झालेल्या पावसाने पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्याने त्यांच्या प्रतवारीवरही परिणाम झाला होता. गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढत असल्याने पालेभाज्यांच्या, विशेषत: कोथिंबीर, पालक, करडई, चुका, चाकवतच्या दरात घट होत आहे.

अवेळी झालेल्या पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या होत्या. घाऊक तसेच किरकोळ बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येणाऱ्या बहुंताश पालेभाज्या खराब प्रतीच्या होत्या. मात्र बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने खराब पालेभाज्यांचे दरही तेजीत होते. गेल्या आठवडय़ात किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची विक्री  ५० ते ६० रुपये या दराने केली जात होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर पालेभाज्यांची आवक वाढली असून नवीन उत्पादन येण्यास आणखी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

तरकारी विभागात कोथिंबिरीच्या दोन लाख जुडींची आवक रविवारी झाली  होती. गेल्या आठवडय़ात मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली होती. रविवारी बाजारात मेथीच्या ३० हजार जुडींची आवक झाली. मागणी वाढल्याने मेथीच्या दरात वाढ झाली. घाऊक बाजारात मेथीच्या दरात जुडीमागे ५ रुपयांनी आणि अंबाडी, चवळईच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली. कोथिंबीर, पालक, कांदापात, चाकवत, चुका या पालेभाज्यांच्या दरात मात्र घट झाली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची विक्री १२ ते १५ रुपये या दराने केली जात आहे.

पालेभाज्यांचे किरकोळ बाजारातील दर

कोथिंबीर- १२ ते १५ रुपये

  पालक- २० रुपये

  शेपू- १५ ते १८ रुपये

मेथी- १८ ते २० रुपये

वाचा : पालक खाण्याचे ‘हे’ फायदे ऐकाल, तर आजपासून आहारात कराल समावेश

अवेळी झालेल्या पावसाने पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. पालेभाज्या खराब झाल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला होता. कोथिंबिरीसह सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर पालेभाज्यांची लागवड पुन्हा करण्यात आली. नवीन पालेभाज्या आता बाजारात विक्रीसाठी पाठविल्या जात आहेत. बाजारात कोथिंबिरेचे दर कमी झाले आहेत. चंपाषष्ठीपर्यंत मेथीचे दर थोडे जास्त राहतील. कांदापात वगळता सध्या सर्व पालेभाज्यांचे दर उतरले आहेत.

– प्रकाश ढमढेरे, भाजी विक्रेते, किरकोळ बाजार