अंबरनाथः उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती रूग्णालयाची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. शहरात असलेल्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रूग्णालयातील खाटांची क्षमता लवकरच वाढणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात पार पडलेल्या विशेष बैठकीत या दोन्ही रूग्णालयातील खाटांची क्षमता दुप्पटीने करण्याचा निर्मय घेण्यात आला आहे. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कल्याणसह कर्जत, मुरबाड तालुक्यातील रूग्णांसाठी आणि पोलिसांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयाच्या खाटांमध्ये दुप्पटीने वाढ होणार आहे. सध्या या रूग्णालयाची क्षमता १०० खाटांची असून ती लवकरच २०० केली जाणार असल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. तसेच अंबरनाथ लगतच्या परिसरातील रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या कै. डॉ. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या खाटांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ केली जाणार आहे. सध्या या रूग्णालयाची खाटांची क्षमता ५० असून ती १०० केली जाणार आहे. त्यासाठी रूग्णालयाच्या आवारात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीर्ण निवासी इमारतींना पाडून त्या ठिकाणी नव्या इमारती बांधण्याच्या सूचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: ठाणे: आयुक्त अभिजीत बांगर सुट्टीवर गेल्याने महापालिकेत शुकशुकाट

अंबरनाथ, उल्हासनगर शहरातील आरोग्य सुविधांबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही शहरातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शहरातील आरोग्य सुविधांच्या समस्या मांडल्या. या बैठकी दरम्यान अंबरनाथ येथील कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेले शासकीय निवासस्थानाची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने अंबरनाथ नगरपरिषदेमार्फत धोकादायक घोषित करण्यात आली असून ही इमारत तातडीने पाडण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांना देण्यात आल्या. त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून १०० बेड करीता इमारतीचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याच्या सूचना आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दिल्या. उल्हासनगर कॅम्प तीने येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय १०० बेडवरून २०० बेडचे करण्याबाबतचा प्रस्तावही आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालका मार्फत शासनास सादर करण्यात आला असून त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मंत्री सावंत यांनी दिल्या.

हेही वाचा: ठाणे: ठाण्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ; २७१ संशयित रुग्णांमध्ये ३७ रुग्ण गोवर रुबेला बाधीत

खाटा वाढल्याने सुविधाही वाढणार
उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या खाटा वाढल्याने अतिरिक्त कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे लवकरच या रूग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध होणार आहेत. नुकतेच या रूग्णालयात दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे खर्चिक उपचारांपासून रूग्णांची सुटका झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The capacity of hospital of ulhasnagar ambernath will be increased health minister tanaji sawant thane news tmb 01
First published on: 16-11-2022 at 17:36 IST