नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद चिघळत असून, असून, “नालायक कोण?” या शब्दांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नेते खासदार नरेश म्हस्के यांनी या वक्तव्यांचा तीव्र निषेध करत नाईक यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

शिवसेना–भाजपा महायुती सत्तेत आहे. तरी काही अतृप्त आत्मे नवी मुंबईतील केवळ पदाकरता भाजपाच्या जवळ राहून आमच्या नेत्यांविषयी चुकीची वक्तव्यं करत आहेत. त्यांचं वय झालं आहे, हे आम्ही मान्य करतो; पण त्यामुळे तोल जाऊन दुसऱ्यांचा अपमान करायचा अधिकार त्यांना कोणी दिला? स्वतःच्या छातीवर हात ठेवून, देवाची शपथ घेऊन सांगावं – दुसऱ्याला ‘नालायक’ म्हणण्याची पात्रता आहे का?, असे म्हस्के म्हणाले.

वक्तव्यांचा तीव्र निषेध

ज्यांची स्वतःची मर्यादा एकेकाळी नवी मुंबईपुरती होती, त्यांचा आता सारा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान परिचित आहे, पण त्याचसोबत त्यांचा अहंकारही वाढला आहे. नालायक मंडळ, नालायकगिरी मंडळ असे शब्द वापरून ते स्वतःची प्रतिमा अधिक खराब करत आहेत. आम्ही या वक्तव्यांचा तीव्र निषेध करतो, असे म्हस्के म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे लाखो महिला लाडका भाऊ म्हणून पाहतात, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्यं करणे अत्यंत निंदनीय आहे. ज्यांचा लेखाजोखा नवी मुंबईतील प्रत्येक गल्लीला माहीत होता, तो आज महाराष्ट्रभर गेला आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांवर बोट ठेवण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

स्वतःच्या घराण्याचा फायदा

एफएसआय वाढवणं हे लोकहिताचं पाऊल आहे. सिडकोच्या जुन्या वसाहतींमध्ये राहत असलेल्या भूमिपुत्र, माथाडी कामगार आणि नागरिकांना पुनर्विकासातून मोफत मोठं घर मिळतंय. या निर्णयामुळे सामान्य माणसाला फायदा झाला आहे, पण काही जणांना याचं श्रेय शिंदे यांना गेलं म्हणून राग येतोय. गणेश नाईक यांचा दुतोंडीपणा आता समोर येतोय. स्वतःला नवी मुंबईचा राजा समजून त्यांनी सत्तेचा उपयोग फक्त स्वतःच्या घराण्याच्या फायद्यासाठी केला. नवी मुंबईतील कामगार, भूमिपुत्र, माथाडी वस्तींच्या समस्या त्यांनी कधी सोडवल्या नाहीत. उलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांत धोकादायक इमारती, पुनर्विकास, आणि एफएसआय अशा अनेक प्रलंबित विषयांवर निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला., असे ते म्हणाले.

नाईकांना इशारा

एकनाथ शिंदे यांनी स्थानिक जनतेच्या न्यायासाठी घेतलेले निर्णय काहींना पचत नाहीत. ठाण्यातील कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला, पालकमंत्री झाला, एवढंच त्यांच्या जळण्याचं कारण आहे. त्यांचा मुलगा तीन वेळा खासदार निवडून आला, पण तरीही ही जलन थांबत नाही, असे ते म्हणाले. आम्ही त्यांना ज्येष्ठ म्हणून सन्मान देतो, पण जर अशा प्रकारच्या वक्तव्यांचा सिलसिला सुरू राहिला, तर आम्हालाही उत्तर द्यावं लागेल. अशा अपमानास्पद वक्तव्यांना नवी मुंबईतील जनतेकडूनही विरोध होईल, असा इशारा त्यांनी दिला.