ठाणे : लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्ताधाऱ्यांनी पैसा आणि सत्तेचा वापर करत निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांची नेमणुका करुन आपली पोळी भाजून घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत आलेला पराभवनंतर पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न विचारे यांनी केला होता. त्यावेळी जनमत हे आपल्या बाजूने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या सोबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा आरोप केला आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून नेहमी सांगण्यात येते की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत यामध्ये झालेल्या अपारदर्शकता असल्याचे पत्र ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी यांना नुकतेच दिले होते. परंतु याचे लेखी उत्तर प्राप्त झाले नसल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणुकी संदर्भात पुन्हा स्मरण पत्र देऊन पत्रामध्ये नमूद केलेल्या वस्तुस्थितीचा खुलासा सादर करावा अशी मागणी केली. सरकार हे बदलत असतात कोणी कायमस्वरूपी नसते. ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांसारखी काम करून घेतली जात आहेत. लोकसभेला आम्ही सहन केले, विधानसभेला सहन केले जाणार नाही. तसेच कोणी कामे केलेली आहेत. या सर्व लोकांची नावे आमच्याकडे आहेत. वेळ आल्यास नक्की जाहीर करू, जर अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटत असाल, तर रस्त्यावर उतरून काम करावे लागेल असा इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा…ठाण्यात दोन्ही शिवसेनेत पोस्टर वॉर, उबाठाच्या पोस्टरला शिंदे सेनेकडून पोस्टरने उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेल्या बोगस मतदानाला आळा बसावा यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी निवडणूक आयोग व निवडणूक अधिकारी ठाणे यांना दिलेल्या पत्रामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघातील विधानसभासहित १४५,१४६, १४७,१४८,१५० आणि १५१ विधानसभा मतदार यादीतील दुबार नावांची आकडेवारी तसेच दुबार मतदारांनी दोन ते तीन वेळा केलेल्या मतदाराची आकडेवारी पुरावे सहीत दिली आहेत. यावेळी ती दुबार नावे वगळावी त्यासह एखाद्या यादीमधील अपरिचित व्यक्ती जी कोणी तेथे राहत नसतील तर, त्यांना नोटीसा पाठवून त्यांचे नाव कोणत्या यादीमध्ये ठेवावे किंवा ठेवू नये यावर तातडीने कार्यवाही करावी अशा मागण्या करण्यात राजन विचारे यांनी पत्राद्वारे केल्या आहेत. तसेच नुकतीच प्रसिद्ध झालेली प्रारुप यादी दिल्यास पुन्हा दुबार नावे शोधण्यास सोपे जाईल आणि वगळण्यात येणारी नावे पुन्हा नोंदाविण्यास मदत करणाऱ्या दोषीवर कार्यवाही करण्याची विनंती देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे.