ठाणे: जुन्या वस्तू खरेदी विक्रीच्या ‘ओएलएक्स’ ॲपवर एका मालवाहतुकदाराला त्याचा टेम्पो विक्री करणे महागात पडले. चार भामट्यांनी या मालवाहतुकदाराला टेम्पो चालवून पाहतो असे सांगून टेम्पो चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

भिवंडी येथील पूर्णा भागात फसवणूक झालेल्या तरूणाचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. त्याला मोठा टेम्पो खरेदी करायचा होता. त्यामुळे त्याने ‘ओएलएक्स’ या ॲपवर टेम्पो विक्रीसाठी नोंद केली होती. त्याआधारे सोमवारी एका व्यक्तीने संदेश पाठवून टेम्पो खरेदीसाठी इच्छूक असल्याचे कळविले होते. तसेच त्या व्यक्तीने मागणी केल्यानुसार तरुणाने त्याचा मोबाईल क्रमांक दिला. या क्रमांकावर संपर्क साधुन त्याने टेम्पो पाहण्यासाठी येणार असल्याचे कळविले.

हेही वाचा… भिवंडीजवळ खारबाव-कामण रेल्वे मार्गावर उड्डाण पुलाची उभारणी

तरूणाने त्या व्यक्तीला त्याच्या पूर्णा येथील गोदामाचा पत्ता पाठविला. सोमवारी सायंकाळी तो व्यक्ती आणि त्याचा एक साथिदार टेम्पो पाहण्यासाठी आला. हा टेम्पो आठ लाख रुपयांना खरेदी करण्याचे त्या दोघांनी ठरविले. टेम्पोची चांगली किंमत मिळत असल्याने तरूणाने टेम्पो विक्री करण्यास होकार दर्शविला. त्यानंतर त्या व्यक्तीने सहा लाख रुपये ऑनलाईन आणि दोन लाख रुपये एटीएममधून काढून देतो असे सांगितले.

हेही वाचा… ‘उबाठा’चे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा राजीनामा; ठाकरे गटाला डोंबिवलीत मोठा धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरूणाने एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्या व्यक्तीला अंजुरफाटा येथे नेले. तर त्याचा साथिदार टेम्पोजवळ थांबला. एटीएममध्ये गेल्यानंतर त्याने पैसे निघत नसल्याचे तरुणाला सांगितले. पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीने पैसे आणतो असा बनाव करून तिथून निघून गेला. तर गोदामाजवळ आणखी दोघे आले. त्यांनी गोदामातील कामगाराकडून टेम्पोची किल्ली घेतली. टेम्पो चालवून पाहतो असे सांगत ते टेम्पो घेऊन निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.