सागर नरेकर
गेल्या दहा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे अवघ्या पंधरवड्यातच सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. ठाणे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी ४५० मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा १५ सप्टेंबर रोजीच पावसाने ही सरासरी ओलांडली. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत जवळपास ५०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यात बदलापूर शहरात सर्वाधिक ६४९ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.

हेही वाचा >>> मुंबई – ठाण्यात संततधार ; सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात , लोकल संथगतीने सुरू

जून महिन्यांत दांडी मारणाऱ्या आणि जुलै महिन्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात काही काळ विश्रांती घेतली होती. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि गणेशोत्सवादरम्यान काही दिवस पाऊस बरसला. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरूवातीला ठाणे, मुंब्रा, कळवा या शहरांमध्ये पावसाचे विक्राळ रूप पहायला मिळाले होते. त्यानंतर दोन दिवसात कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये टप्प्याटप्याने पाऊस कोसळला. गेल्या दहा दिवसात ठाणे जिल्ह्यात दररोज होणाऱ्या गडगडाटी पावसामुळे अवघ्या पंधरा दिवसातच पावसाने सप्टेंबर महिन्याची सरासरी ओलांडली आहे. ठाणे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दर वर्षी सरासरी ४५० मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा अवघ्या पंधरा दिवसातच पावसाने ही सरासरी ओलांडली असून ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ५०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये सरासरी ७५ मिलीमीटर पावसाची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी होऊ शकतो, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसातच झाला आहे. गेल्या वर्षातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता पण त्यासाठी महिना लोटावा लागला होता. यंदा कमी वेळात जास्त पाऊस पडल्याचेही मोडक यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

सप्टेंबर महिन्यातील आतापर्यंतता पाऊस
शहर पाऊस(मि.मी)
ठाणे ४९४
कल्याण ५५४
उल्हासनगर ४४०
अंबरनाथ ५१८
बदलापूर ६४९
मुरबाड ५७९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या २४ तासातील पाऊस
शहर पाऊस (मि.मी)
बदलापूर १०२
मुंब्रा ८२
कल्याण ८०
ठाणे ७५
बेलापूर ७४
विठ्ठलवाडी ७३
डोंबिवली ६९