ठाणे: येथील रेमंड कंपनीच्या जागेवर कोट्यावधी रुपये खर्चून ठाणे महापालिका मुख्यालयाची ३२ मजली इमारत उभारण्यात येत असतानाच, संपुर्ण पालिका क्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करणाऱ्या पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या छतातून पावसाचे पाणी गळत असल्याची बाब पुढे आली आहे. छतातून थेंबथेंब पाणी गळत असून अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन पथकाला काम करावे लागत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात इमारती कोसळण्याचे प्रकार घडतात. काही वर्षांपुर्वी मुंब्रा येथे लकी कंपाऊंडमधील इमारत कोसळून त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला होता. काही वेळेस पावसाचे पाणी तुंबूनही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून रस्ता वाहतूकीसाठी बंद होतो. अशा आपत्तीच्या काळात घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे काम ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात येते. या कक्षाची निर्मीती पालिकेने काही वर्षांपुर्वी केली. पाचपखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालयाशेजारीच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या छतातून पावसाचे पाणी गळत असल्याचे दिसून आले.
रविवार मध्यरात्री पासून ठाणे शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाचे पाणी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या छतामधून गळत होते. अनेक ठिकाणी छतातून पाणी गळती होत असून अशा परिस्थितीत तेथील अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. एकीकडे रेमंड कंपनीकडून प्राप्त भूखंडावर ७२७ कोटी रुपये खर्चुन ३२ मजली महापालिका मुख्यालय उभारण्यात येत असताना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यालयाच्या गळतीकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येते.
लकी कंपाउंड तसेच इमारत दुर्घटना यासह शहर आणि जिल्ह्यातील आपत्तीच्या काळात हा विभाग रस्त्यावर उतरून काम करताना दिसून येतो. मात्र, कार्यालयातील छत गळतीमुळे नागरिकांच्या आपत्तीच्या काळात मदतीसाठी धाव जाणाऱ्या या विभागावर आपत्ती ओढावल्याचे चित्र दिसून येत आहे.