ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातून ठाणे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना स्थानकाबाहेर आल्यानंतर तात्काळ रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सॅटीस पूलाखाली रिक्षा थांब्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. या थांब्यावरून मीटरच्या रिक्षा प्रवासी वाहतूक करत असतात. यामुळे या थांब्यावर प्रवाशांच्या कायम लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. मात्र, प्रवाशांना रांगेत उभे राहण्यासाठी असलेल्या ठिकाणाच्या छप्परची अनेक दिवसांपासून दुरावस्था झालेली आहे. त्यात दुरावस्थेच्या ठिकाणी जाहिरातीसाठी लागणारे लोखंडी सांगाडे उभे करून ठेवण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे शहरात तसेच त्यापलीकडील शहरांमध्ये कामानिमित्त लाखो प्रवासी प्रवास करत असतात. शहरातील नौपाडा, वागळे इस्टेट, घोडबंदर, ढोकाळी अशा विविध भागात अनेक काॅल सेंटर, आयटी कंपन्या तसेच लघु उद्योजक कार्यालये आहेत. यामुळे ठाणे शहरात नेहमी कामानिमित्त कल्याण, डोंबिवलीसह इतर भागातील अनेक नोकरदार येत असतात. त्याचबरोबर ठाणे शहरातील अनेक नागरिक मुंबई, नवी मुंबई शहरातील कंपन्यांमध्ये काम करतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची दिवस – रात्र वर्दळ सुरूच असते. या प्रवाशांना तात्काळ रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर म्हणजेच सॅटीस पूलाखाली रिक्षा थांब्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. या थांब्यावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी मीटर रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असतात. यामुळे प्रवाशांना सहज मीटर रिक्षा पकडून इच्छितस्थळी प्रवास करता येतो. दररोज या थांब्यावर सकाळ सायंकाळच्यावेळी प्रवाशांची लांबच लांब रांग लागलेली असते. प्रत्येक प्रवाशाला रिक्षा मिळावी तसेच नियोजन पद्धतीने जाता यावे यासाठी या ठिकाणी लोखंडी अडथळे लावण्यात आलेले आहे.
या अडथळ्यांमध्ये प्रवासी रांगेत उभे असतात. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या थांब्यावर छप्पर आहे. हे छप्पर मागील काही दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसात थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांना भिजावे लागत आहे. यामुळे लांबच्या अंतरावरून येणाऱ्या नोकरदार वर्गाला कार्यालयात ओलेचिंब अवस्थेत पोहोचण्याची वेळ येत आहे. याशिवाय, थांब्यावर छप्पर तुटलेले असतानाच त्याच ठिकाणी जाहिरातीसाठी लोखंडी सांगाडे उभे करून ठेवण्यात आले आहेत. थांब्यावर रांगेत उभे असलेले नागरिक या सांगाड्यांच्या खाली उभे राहत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या रिक्षा थांब्याचे छप्पर दुरुस्त करावे तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून उभ्या करण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्यांबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
प्रतिक्रिया
स्थानकाबाहेर कायम रिक्षासाठी गर्दी असते. रांगेत उभे असताना तुटलेल्या छप्परमुळे पावसाचा तसेच उन्हाचा मारा सहन करावा लागतो. त्यात ज्या ठिकाणी छप्परची दुरावस्था झालेली आहे तिथेच जाहिरातीसाठीचे लोखंडी सांगाडे उभे करून ठेवण्यात आले आहेत ते सांगाडे कधीही एखाद्या प्रवाशांचा धक्का लागला किंवा जोरदार वारा आला तर अंगावर पडू शकतात. पुनम पवार, प्रवासी