ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी कळवा, मुंब्रा, दिवा, रुपादेवी पाडा, किसन नगर क्र. २, नेहरू नगर, कोलशेत खालचा गाव या भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे या भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा कळवा, दिवा आणि मुंब्रा भागात करण्यात येतो.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.

या कामासाठी गुरूवार, २२ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २३ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात दिवा, मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग, तसेच, वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसन नगर नं २, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्ण बंद राहील. तसेच, शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा. तसेच, काटकसरीने पाणी वापरून अपव्यय टाळावा असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.