डोंबिवली: कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलच्या दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या हातावर रेल्वे मार्गात उभे राहून फटका मारायचा. प्रवाशाच्या हातामधील मोबाईल किंवा पिशवी खाली पडली की ती घेऊन पळून जायाचे. अशाप्रकारे रेल्वे मार्गात उभे राहून चोऱ्या करणाऱ्या कल्याण पूर्वेतील नांदिवली भागातील एका तरूणाला डोंंबिवली लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक कली आहे.
सुमित कमलेश सिंग (२६) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील नांंदिवली तर्फ भागातील गावदेवी इमारतीत राहतो. सुमितवर लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून प्रवाशाकडून चोरलेला सोळा हजार रूपये किमतीचा मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे.
डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले, एक रेल्वे प्रवासी शुक्रवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान सीएसएमटी कल्याण लोकलने प्रवास करत होता. ही लोकल धिमी होती. प्रवासी या धिम्या गतीच्या लोकलमध्ये सामान्य डब्यात दरवाजात उभा राहून कल्याण दिशेने प्रवास करत होता. डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर रेल्वे मार्गात उभे असलेल्या एका इसमाने लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर जोराने फटका मारला.त्याबरोबर त्या प्रवाशाच्या हातामधील सोळा हजार रूपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल रेल्वे मार्गात पडला. रेल्वे मार्गाच्या बाजुला उभा असलेला इसम हा रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उभा असेल असे प्रवाशांना वाटले. तो चोर निघाला.
मोबाईल रेल्वे मार्गात पडताच लोकलमधील प्रवासी अस्वस्थ झाला. लोकल धावत असल्याने प्रवाशाला लोकलमधून उडी मारून चोराला पकडून मोबाईल ताब्यात घेता येत नव्हता. लोकलमधील प्रवाशांनी चोर म्हणून ओरडा सुरू केला.प्रवाशांचा ओरडा ऐकून रेल्वे मार्ग परिसरात गस्तीवर असलेल्या दोन रेल्वे पोलिसांना डब्यात काही तरी झाले आहे असे समजले. प्रवाशांनी पळत असणाऱ्या इसमाने हातावर फटका मारून मोबाईल चोरल्याचे पोलिसांना सांगितले. दोन्ही पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे मार्गातून पळत असलेल्या इसमाचा पाठलाग केला. त्याला दोन्ही बाजुने घेरून रेल्वे मार्गाजवळ पकडले. इतर पोलीस मदतीला धावून आले. त्याला पकडून डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
दोन्ही पोलिसांनी पकडून ठेवलेले असताना हा इसम पळून जाण्यासाठी प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी खाक्या दाखवत त्याला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ प्रवाशाच्या चोरीचा मोबाईल आढळून आला. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक जारवाल, उपनिरीक्षक सोनार, भिलारे, तायडे, नष्टे, पवार, सुरक्षा बळाचे विवक पाटील यांनी पार पाडली.