लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : येथील पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या मुरबाड रस्त्यावरून शुक्रवारी दुपारच्या वेळेत पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या महिलेने चोर म्हणून ओरडा केला, तोपर्यंत दुचाकीवरील चोरटे पळून गेले होते. ५५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र होते.

महात्मा फुले पोलीस ठाण्यात महिलेने या चोरीप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तक्रारदार महिला कल्याण पश्चिमेतील पौर्णिमा चौक भागात कुटुंबियांसह राहते. शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजता तक्रारदार महिला आपल्या शाळकरी मुलीला खासगी शिकवणी वर्गात सोडण्यासाठी पुरंदरे वसाहतीमध्ये गेल्या होत्या. मुलीला सोडल्यानंतर त्या एकट्याच दुपारच्या वेळेत पायी घरी परतत होत्या. त्या मुरबाड रस्त्यावरील किशोर बूट दुकानासमोरून जात असताना, त्यांच्या पाठीमागून अचानक एक दुचाकी वेगाने पादचारी महिलेच्या अंगावर आली. त्या रस्त्याच्या बाजुला झाल्या. तेवढ्या वेळेत दुचाकीवरील इसमांनी तक्रारदार महिलेला काही कळण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ५५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र जोराने हिसकावले. तेथून त्यांनी पळ काढला.

आणखी वाचा-ठाणे : सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन कोटी रुपयांना ऑनलाईन फसवणूक

मानेला जोराने हिसका बसल्याने महिलेला सुरूवातीला काही क्षण काय घडले हे कळलेच नाही. त्यांनी मानेभोवती हात लावला. त्यावेळी त्यांना आपले सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या इसमांनी खेचून पळून गेले असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले. त्या चोर म्हणून ओरडल्या, तोपर्यंत दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण, डोंबिवलीत काही दिवसांपासून दुचाकीवरून येऊन मंगळसूत्र, सोन्याचा ऐवज लुटण्याचे प्रकार थांबले होते. हे प्रकार आता पुन्हा सुरू झाले आहेत. ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता, एमआयडीसी डोंबिवली, खडकपाडा भागात नागरिक सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. त्या काळात हे प्रकार अधिक प्रमाणात होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.