ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त जुन्या ठाण्यात निघणाऱ्या मिरवणुका, स्वागत यात्रा आणि त्यात सहभागी होणारे राजकीय नेते असा माहोल हा काही ठाणेकरांना नवा नाही. यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे ठाण्यातील गुढी पाडव्याचा हा सोहळा लक्षवेधी ठरला. मात्र या सोहळ्यात सर्वाधिक चर्चा होती ती महायुतीच्या न जाहीर झालेल्या उमेदवाराची.

पाडव्याच्या पूर्वसंध्येला महायुतीचा उमेदवार जाहीर होईल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा उमेदवार ठाण्याच्या चौका-चौकात गुढी उभारेल असा अंदाज येथील राजकीय क्षेत्रात बांधला जात होता. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांना उमेदवाराविनाच या स्वागत यात्रेत सहभागी व्हावे लागले. विशेष म्हणजे, माध्यम प्रतिनिधींकडूनच नव्हे तर काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, नेते यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांना ‘साहेब ठाण्याचे काय?’ असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे काहीसे कातावलेल्या मुख्यमंत्र्यांनी एका माध्यमप्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर आमचे आम्ही पाहून घेऊ असे म्हणत प्रश्नाला टोलावले.

male candidates Kalyan
कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

हेही वाचा – ठाणे विभाग भाजपासाठी महत्त्वाचा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुचक विधान

महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा हंंगाम साधारणपणे हाच असतो. एप्रिल-मेच्या मध्यमावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आजवर शिवसेनेचा उमेदवार ठरलेला असतो असा अनुभव आहे. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेनिमित्ताने शिवसेना भाजप युतीकडून या उमेदवाराचे पुरेपूर ‘ब्रँडींग’ही केले जाते. चार दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील पाडव्याची गुढी महायुतीच्या उमेदवारामार्फत उभारली जाईल अशी घोषणा केली होती. एका अर्थाने शिवसेना भाजप युतीची ठाण्यात ही परंपरा राहिली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये राजन विचारे यापूर्वी विजय चौघुले यांनी युतीचे उमेदवार म्हणून गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रांमध्ये क्रियाशील सहभाग नोंदविला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्याकडे शिवसेनेची धुरा आल्यानंतर यंदाही ही ‘परंपरा’ पाळली जाते का याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. ठाण्याचा तिढा मात्र कायम असल्याने ही ‘परंपरा’ यंदा मोडीत निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रूखरूख आणि प्रश्नांची सरबत्तीही

गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रे निमित्त ठाण्यात मोठ्या संख्येने जमणाऱ्या जनसमुदायापुढे महायुतीचा उमेदवार पुढे आणण्याची नामी संधी गमावल्याची रूखरूख महायुतीचे नेते दबक्या आवाजात बोलून दाखवित होते. आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के असे महायुतीचे चर्चेत असलेले संभाव्य उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत स्वागत यात्रेत उपस्थित होते. भाजपचे आमदार संजय केळकर आणि पक्षाचे नेते विनय सहस्त्रबुद्धे हे देखील दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्र्यांसोबत होते. मात्र भाजपकडून ठाणे लोकसभेसाठी चर्चेत असलेले संजीव नाईक यांची मुख्यमंत्र्यांसमवेतील अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली होती. ते सकाळी श्री कौपिनेश्वर मंदिर येथे मिरवणुकीत काहीवेळ थांबून निघून गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. यावेळी काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना ठाण्याचे काय ? असा सवालही केल्याचे सांगितले जाते. यावर लवकरच निर्णय होईल असे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून दिले जात होते. दरम्यान, एका माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर मात्र मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ठाण्याशिवाय दुसरे काही दिसत नाही का असा प्रतिप्रश्न केला. यामुळे ठाण्याच्या प्रश्नावर साहेब चिडले अशी चर्चा माध्यम प्रतिनिधींमध्ये होती.