कल्याण- मुसळधार पावसामुळे कल्याण शहराच्या विविध भागातील, वालधुनी काठ परिसरातील सुमारे एक हजार कुटुंबांचे गुरुवारी रात्री कल्याण डोंबिवली पालिकेच्या आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी संक्रमण शिबिरात स्थलांतर केले. वालधुनी नदी काठच्या शिवाजीनगर वस्तीला पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये सम्राट अशोक विद्यालयाचा ‘घरातील शाळा’ उपक्रम

मुसळधार पावसामुळे कल्याण शहरातून वाहणारी वालधुनी नदी दुथडी वाहत आहे. या नदी काठी वालधुनी, शिवाजीनगर वसाहत आहे. वालधुनी नदीचे पात्र सखल असल्याने पुराचे पाणी गुरुवारी रात्री वालधुनी, शिवाजीनगर वस्तीत शिरले. चाळी जलमय झाल्या. रात्रीच्या वेळेत पाणी वाढले तर अडकून पडू अशी भीती या भागात पसरली. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आपत्कालीन पथकाने तातडीने वालधुनी नदी काठी येऊन या भागातील ९५० कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्यात आली.

चक्की नाका भागातील काही चाळींमध्ये पुराचे पाणी गुरुवारी रात्री शिरले. या भागातील ५० कुटुंबीयांना पालिकेच्या संक्रमण शिबिरात बचाव पथकांनी सुरक्षितपणे स्थलांतरित केले. आ. गणपत गायकवाड यांनी रात्री येऊन स्थलांतरित नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने त्यांची काळजी घेण्याचा सूचना प्रशासनाला केल्या.

हेही वाचा >>> डोंबिवलीत सराफाकडून ग्राहकांची फसवणूक; महिला ग्राहकांकडून सराफाच्या ऐवजावर डल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वालधुनी नदी गाळाने भरली आहे. या नदीमधील गाळ बाहेर काढणे आवश्यक आहे. अनेक वर्ष मागणी करुन गाळ काढला जात नाही. याशिवाय नाले, गटार सफाईची कामे पालिकेकडून योग्यरितीने होत नाहीत. त्यामुळे अशी पूर परिस्थिती निर्माण होते, अशी प्रतिक्रिया आ. गणपत गायकवाड यांनी दिली. स्थलांतरित नागरिकांना पालिकेकडून अन्नाची पाकिटे, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.