कल्याण : आमच्या घरात तीन उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला चार सदस्य प्रभाग पध्दतीत एका प्रभागात तीन तिकिटे मिळालीच पाहिजेत. ही उमेदवारी देण्यात आली नाहीतर मग मात्र आम्ही अन्य पर्याय निवडू, अशा धमक्याच आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्थानिक, जिल्हा नेतृत्वाला दिल्या आहेत. त्यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे. असे कोंडीचे वातावरण असतानाच, मंगळवारी प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षण सोडतीमुळे अनेकांचे पत्ते कापले गेले, तर काहींना एका घरात दोन ते तीन तिकिटे मिळणे अवघड झाले. या सोडत प्रकाराने अनेकांना निवडणूक लढविण्याचे धुमारे फुटाले तर काहींचा हिरमोड झाला.
राज्य निवडणूक आयोग आणि शासनाच्या निर्देशानुसार मंगळवारी कल्याण डोंंबिवली पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली. अत्रे रंगमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे उपस्थित होते.
१२२ प्रभागांमधून चार सदस्य प्रभाग पध्दतीत एकूण ३१ प्रभाग आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये कल्याण डोंबिवली पालिकेची लोकप्रतिनिधी राजवटीची पाच वर्षाची मुदत संपली. त्यानंतर साडे चार वर्ष पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. मुदत संपल्याच्या काळात करोना महासाथ सुरू होती. या कालावधीत निवडणुका लागल्या तर आपल्याला जनमताचा पाठिंबा मिळावा म्हणून करोना काळात पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी नागरिकांना किराणा, भाजीपाला, पाण्याच्या टाक्या साफ करून दे, सोसायटी आवारात फरशा, पेव्हर ब्लाॅक बसून दे, इमारतींना रंग लावून दे, मालमत्ता कराच्या थकित रकमा भरून दे अशी अनेक समाज, लोकोपयोगी कामे करून दिली.
अशाप्रकारचे वाटप करून इच्छुक थकले तरी पालिका निवडणुका लागल्या नाहीत. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक गलीतगात्र आणि आर्थिक तंगीत आहेत. त्यात चार सदस्य प्रभाग पध्दती आहे. त्यामुळे एकमेकांचा आधार घेऊन निवडून यायचे आहे. अनेक इच्छुकांची कोंडी झाली आहे. ज्या तरूण इच्छुक, माजी नगरसेवकांनी मागील साडे चार वर्षात प्रभागात समाजसेवेची कामे केली. त्यामधील अनेकांना चार सदस्य प्रभाग पध्दतीत उमेदवारी मिळणे अवघड आहे. अपक्षांचा या नव्या पध्दतीत टिकाव लागणार नाही. आता आयत्यावेळी पक्ष बदलून उमेदवारी मिळेल का असे भाव अनेकांच्या चेहऱ्यावर आहेत.
गेल्या वीस वर्षापासून पालिकेवर गारूड करून बसलेले जुने जाणतेही आता निवडणूक लढविण्यासाठी पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. महायुतीमधील बेबनाव, युती होते की नाही याची धूसर शक्यता, राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटाची क्षीण ताकद या सगळ्या अवघडल्या राजकीय परिस्थितीत इच्छुक उमेदवार, पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. १५ लाख १८ हजार ७६२ लोकसंख्या गृहित धरून प्रभाग आरक्षणे काढण्यात आली. एकूण १२२ जागांपैकी अनुसूचित जाती १२, अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग ३१, एक सोडतीने, सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित जागा ३७, बिनराखीव जागा ३८. आरक्षणाची प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यावर नागरिकांना १७ ते २४ नोव्हेंंबर काळात हरकती घेता येणार आहेत.
