शहापूर : मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा भागात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. रियाज हैसीयत अली, आसादुल्लाह आणि अफजल अशी मृतांची नावे असून तिघेही उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मोटारीचा अक्षरश: चुराडा झाला होता.
मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने मोटारीने चालकासह चारजण वाहतुक करत होते. ही मोटार ऑरेंज उपाहारगृहासमोर आली असता, चालकाने निष्काळजी आणि बेदरकारपणे मोटार चालविल्याने उतारावरील वळणावर असलेल्या एका खडकावर मोटार आदळून उलटली. या अपघातात मोटारीचा अक्षरशः चुराडा झाला असून चालकाने पळ काढला.
घटनेची माहिती कसारा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मोटारीत बसलेले रियाज हैसीयत अली, आसादुल्लाह आणि अफजल या तिघांच्या हाता-पायाला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळले.
तिघांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरु आहे.