डोंबिवली : यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन डोंबिवली पश्चिमेतील फुलेनगर ठाकुरवाडी भागात राहत असलेल्या एका १६ वर्षाच्या विद्यार्थ्याला कोपर पुलाजवळील सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील तीन तरूणांनी स्टम्प, पेव्हर ब्लाॅकने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र पुढे आला तर त्यालाही टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. मंगळवारी रात्री बारा वाजता हा प्रकार घडला आहे.

सोळा वर्षाचा तक्रारदार विद्यार्थी डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी फुलेनगर भागात आपल्या कुटुंबीयांसह राहतो. तो परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. या अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी डोंबिवली कोपर रेल्वे उड्डाण पुलाजवळील सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील कुणाल कुशाळकर (१९), अविनाश वाकोडे (२०), किशोर पवार (२१) या तरूणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील पंडित दिनदयाळ चौकात हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. मारहाणीसाठी खेळण्यातील स्टम्प, पेव्हर ब्लाॅक यांचा वापर करण्यात आला.

अल्पवयीन विद्यार्थ्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी रात्री आपण पंडित दिनदयाळ चौक येथून पायी घरी चाललो होतो. त्यावेळी आपल्या ओळखीचे असलेले सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील कुणाल कुशाळकर आणि किशोर पवार हे भेटले. मला पाहताच त्यांनी आक्रमक होत मला जुन्या भांडणाचा राग मनात ठेऊन मारहाण करण्यास सुरूवात केली. मी आता तुम्हाला काही केले नाही. तुम्ही मला का मारहाण करता, असे प्रश्न मी त्यांना केले. त्यावेळी त्यांनी जुन्या भांडणाचे दाखले देत आता तुला सोडणार नाही असे बोलत माझ्या तोंडावर क्रिकेट खेळण्यातील स्टम्पचे फटके मारले. चंदन सरदार याने बाजुला पडलेला पेव्हर ब्लाॅकचा ठोकळा उचलून तो आपल्या हातावर आणि पाठीवर मारून गंभीर दुखापत केली. अविनाश वाकोडे आणि चंदन सरदार यांनी नंतर आपणास लाथुबक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

आपणास बेदम मारहाण सुरू असताना माझा मित्र आर्या गायकवाड हा माझ्या बचावासाठी पुढे आला. त्यावेळी या तिघांनी मिळून भांडण सोडविण्यासाठी मध्ये का पडला म्हणून आर्या गायकवाड यालाही बेदम मारहाण केली. त्याच्या हाताच्या पंजावर पेव्हर ब्लाॅक फेकून मारून दुखापत केली. या तरूणांची हाणामारी पाहून दिनदयाळ चौकात रात्रीच्या वेळेत प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक, प्रवासी घटनास्थळावरून निघून गेले. एका अल्पवयीन मुलाला मारहाण होत असताना कोणीही पादचारी नागरिक या हाणामारीचा साक्षीदार नको म्हणून मारहाण होणाऱ्या मुलांच्या बचावासाठी पुढे आला नाही.