ठाणे : नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अती धोकादायक इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा तत्काळ खंडित करावा आणि या इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. तसेच इमारती रिकाम्या करताना महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे आणि अरेरावी करू नये, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कल्याणमध्ये बारावे येथील कचराभूमीला आग

पावसाळा पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे उपस्थित होते. रिक्त करायच्या अती धोकादायक इमारती, त्यातील अडचणी, पर्यायी व्यवस्था, संक्रमण शिबिरे याबाबत चर्चा झाली. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८६ अती धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर, ४९ इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत. या ४९ अती धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. या इमारत अती धोकादायक असल्याचे फलक लावावेत. या इमारतींमधील नागरिकांनी तत्काळ पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे. अती धोकादायक अधिकृत इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था होत नसल्यास, तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यकता भासल्यास, तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे,असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाण्यात पाळीव श्वानाचे वर्षश्राद्ध

अधिकृत इमारतीतील काही कुटुंबांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्यास, स्थानिकांना शक्यतो मान्य होईल असा पर्याय देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे त्या कुटुंबांची कमीत कमी गैरसोय होईल. तसेच, अती धोकादायक आणि धोकादायक इमारती रिकाम्या करताना धोक्याची स्थिती समजावून सांगा, लोकप्रतिनिधींना त्या इमारतीची परिस्थिती सांगा. नागरिक त्यास नक्की सहकार्य करतील. कोणालाही राहते घर सोडावे लागणे दुःखद असते. त्यामुळे त्यांच्या भावना समजून त्यांच्या स्थलांतरासाठी मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत दुर्घटनेमुळे होणारी जीवितहानी टाळणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. अती धोकादायक (सी १ ) आणि धोकादायक (सी २ अ) या दोन्ही प्रकारातील इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा तत्काळ खंडित करावा. जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबद्दल नगरविकास विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यात अजिबात दिरंगाई होऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. शहरात धोकादायक परंतु रचनात्मक दुरुस्ती केल्यावर निवास योग्य होतील, अशा १९२ इमारती आहेत. त्या इमारती रिक्त करून त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. या इमारतींमधील कुटुंबांना या दुरुस्ती काळापुरती नजिकच्या शाळांमधील संक्रमण शिबिरात तात्पुरती पर्यायी निवास व्यवस्था देण्यात येईल. तसेच २३७४ इमारत रिकामी न करता दुरुस्ती करणे आणि १६४७ इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ज्या धोकादायक इमारतींच्या दुरुस्ती अहवालाबाबत शंका आहे, त्यांचे अहवाल व्हीजेटीआय किंवा आयआयटी यांच्याकडून जलद तत्वावर महापालिकेने तपासून घ्यावेत. आवश्यकता पडल्यास त्याचा खर्च महापालिकेने करावा, असे त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc commissioner abhijeet bangar orders to evacuate extremely dangerous buildings zws
First published on: 28-05-2023 at 19:26 IST