ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे शहरातील ठाणे महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या मुंबई विभागाने छापा टाकल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. ठाणे महापालिकेचा आज, बुधवारी ४३ वा वर्धापन दिन आहे. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी (एसीबी) सायंकाळपासूनच ठाण मांडून असल्याचे समजते. एका बांधकाम व्यवसायिकाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांनी २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे कळते आहे.

गेल्याकाही दिवसांपासून ठाणे शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या बांधकाम प्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरु आहेत. त्यात अतिक्रमण नियंत्रण विभाग रडारवर असतानाच ही कारवाई झाली आहे. ठाणे महापालिकेत शंकर पाटोळे हे अतिक्रमण नियंत्रण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत.

बुधवारी ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा केला जात होता. त्यामुळे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शंकर पाटोळे हे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कार्यालयात असताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना लाचेचा हप्ता घेताना हातोहात पकडल्याचे समजते.

तक्रारदार हे बांधकाम व्यसायिक असून पाटोळे यांनी त्यांच्याकडून लाचेची मागणी केल्याचे कळते आहे. ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर पथकाकडून पुढील कारवाई सुरु झाली आहे.

२५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप

मुंबईतील एका बांधकाम व्यवसायिकाची ठाण्यातील घंटाळी परिसरात जागा आहे. त्या जागेवर अतिक्रमण होते. अतिक्रमण हटविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर बांधकाम व्यवसायिकाने मुंबई एसीबीकडे तक्रार केली. त्याआधारे, या पथकाने सापळा रचून आज कारवाई केली. ही लाचेची रक्कम लाखांच्या घरात असल्याचे समजते. मात्र, ती किती होती हे समजू शकले नाही.