scorecardresearch

ठाण्यात मोकळ्या भुखंडावर क्लस्टरच्या इमारती; संक्रमण शिबीरांवर होणारा खर्च वाचविण्यासाठी पालिकेचा प्रस्ताव

या योजनेत बाधित होणाऱ्या इमारती पाडून त्याजागी नव्या इमारती उभारण्यात येणार आहेत.

Building-3
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

मोकळ्या भुखंडांची मालकी असलेल्या शासकीय यंत्रणासोबत प्रस्तावावर चर्चा 

ठाणे : येथील किसननगर भागात समूह पुनर्विकास योजनेचा (क्लस्टर) पहिला टप्पा राबविण्यासाठी परिसरातील राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मालकीचे असलेले मोकळे भुखंड ताब्यात घेऊन त्यावर क्लस्टर योजनेतील इमारती उभारण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. या इमारतींची उभारणी केल्यानंतर त्याठिकाणी योजनेतील लाभार्थींना घरे देऊन त्यांच्या राहत्या इमारती पाडून त्याजागी आराखड्यानुसार इमारतींसह इतर सोयी सुविधांची उभारणी करण्यात येणार आहेत. योजनेतील लाभार्थींकरिता संक्रमण शिबीरांची उभारणी करण्यासाठी दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याबरोबरच मोठा निधी खर्च होणार असून हे सर्व टाळण्यासाठीच पालिकेने हा नवा पर्याय शोधला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> मुंब्र्यात टोरंट कंपनीच्या कार्यालयला राष्ट्रवादीने ठोकले टाळे

ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ते ३० वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या अनेक बेकायदा इमारती धोकादायक झाल्या असून यातील नागरिकांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे यासाठी शहरात समुह पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शहरातील विविध भागांचे एकूण ४५ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्र १५०९ हेक्टर इतके आहे. त्यातील लोकमान्यनगर, कोपरी, किसननगर, राबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, आझादनगर, गोकुळनगर, महागिरी, चरई, सिद्धेश्वर परिसर आणि स्थानक परिसर या भागातील १२ आराखड्यांना यापुर्वीच मान्यता मिळाली आहे. असे असले तरी या योजनेचा पहिला टप्पा किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. हा संपुर्ण परिसर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात येतो. किसननगर भागात क्लस्टर योजना राबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला यापुर्वीच मंजुरी मिळाली असून ही योजना राबविण्यासाठी पालिकेच्या क्लस्टर विभागाक़डून जोरदार हालचाली सुरु आहेत.

हेही वाचा >>> लोढा जंक्शन येथे वाहतूक पोलिसाला दुचाकी स्वारांची मारहाण

या योजनेत बाधित होणाऱ्या इमारती पाडून त्याजागी नव्या इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी बांधकाम पाडकामाचे दर आणि ठेकेदार निश्चित करण्याकरिता पालिकेने निविदा काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या होत्या. या इमारती पाडण्याआधी तेथील रहिवाशांना दुसऱ्याठिकाणी स्थलांतरित करावे लागणार असून त्यासाठी संक्रमण शिबीरे पालिकेला उभारावी लागणार आहेत. संक्रमण शिबीरांच्या उभारणीसाठी दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याबरोबरच मोठा निधी खर्च होणार आहे. त्यानंतर रहिवाशांना संक्रमण शिबीरात स्थलांतरीत करून योजनेतील इमारती उभारण्याचे काम हाती घ्यावे लागणार असून त्यासाठी एक ते दिड वर्षांचा काळ लागणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी पालिकेच्या क्लस्टर विभागाने आता परिसरातील राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मालकीचे असलेले मोकळे भुखंड ताब्यात घेऊन त्यावर क्लस्टर योजनेतील इमारती उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

भुखंड ताब्यात घेण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने संबंधित विभागांसोबत चर्चा सुरु केली

किसननगर परिसरामध्ये एमआयडीसी, कृषी विभाग, आयटीआय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या राज्य शासनाच्या विविध विभागांसह मुंबई महापालिकेचे मोकळे भुखंड आहेत. हे भुखंड ताब्यात घेण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने संबंधित विभागांसोबत चर्चा सुरु केली आहे. या भुखंडांच्या बदल्यात टिडीआर किंवा दुसऱ्या जागी भुखंड द्यायचा का याबाबत संबंधित विभागांसोबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरु असल्याची माहिती पालिकेतील विश्वसनीय सुत्रांनी दिली. तसेच यापैकी पाच भुखंडांची ठाणे महापालिकेच्या क्लस्टर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहाणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 00:57 IST