चौथ्या टप्प्यातील टाळेबंदीची मुदत संपत असताना ठाणे महापालिकेने नौपाडा-कोपरीसह घोडबंदर परिसरात पुढील तीन दिवस संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, वर्तकनगर तसेच कळवा आणि मुंब्रा परिसरात यापुर्वीच संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ३१ मे पर्यत संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत कडक टाळेबंदी लागू असेल. महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका हद्दीत करोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने चौथ्या टप्प्यातील टाळेबंदीची मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहीले असताना शुक्रवार ते रविवार असे सलग तीन दिवस संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत कडक स्वरुपाची टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यापुर्वी नौपाडा-कोपरी तसेच घोडबंदर भागात टाळेबंदीचे नियम काही प्रमाणात शिथील होते. शुक्रवारपासून या भागातही भाजीपाल्याचा पुरवठा बंद केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

जिल्ह्य़ात ३६६ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी दिवसभरामध्ये जिल्ह्य़ात ३६६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता सात हजार ५७ इतका आहे. तर जिल्ह्य़ात दिवसभरात तीन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या २१३ इतकी झाली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी ३६६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील १५५, नवी मुंबईतील ७८, कल्याण-डोंबिवली शहरातील २९, भिवंडी शहरातील ३, अंबरनाथ शहरातील १८, उल्हासनगर शहरातील २६, बदलापूर शहरातील १२, मिरा-भाईंदर शहरातील २८, आणि ठाणे ग्रामीणमधील १७ रुग्णांचा समावेश आहे. त्यातच गुरुवारी जिल्ह्य़ात ३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये नवी मुंबईतील २ आणि कल्याणमधील १ रुग्णाचा समावेश आहे.

पनवेलमध्ये ४१ नवे रुग्ण

पनवेल: पनवेल तालुक्यामध्ये गुरुवारी ४१ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी पालिका क्षेत्रामध्ये २९ आणि ग्रामीण भागात १२ करोनाबाधित आढळले. एका ६२ वर्षीय नागरिकाचा आणि ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दरम्यान, पनवेल महापालिका प्रशासनाने खासगी मेट्रोपोलीस प्रयोगशाळेशी केलेल्या करारानंतर सुमारे १० हजार संशयित रुग्णांची कोविड १९ची चाचणी मोफत करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या सुमारे साडेचार कोटी रुपयांची बचत होणार आहे. पनवेल पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नागरिकांच्या हिताचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Total lockdown in thane till sunday abn
First published on: 29-05-2020 at 00:28 IST