डोंबिवली: एक वर्षाच्या खंडानंतर डोंबिवलीत मंगळवार पासून वाहतूक विभागातर्फे टोईंग वाहन सुरू करण्यात आले. कोठेही वाहन उभी करण्याची सवय जडलेल्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांची या कारवाईने भंबेरी उडाली आहे. दुपारपर्यंत डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातून तीस हून अधिक दुचाकी वाहने उचलण्यात आली आहेत, असे कारवाई पथकातील कर्मचाऱ्याने सांगितले. वाहनतळ क्षेत्रावर वाहन उभे केले नाही म्हणून ५०० रुपये आणि वाहन उचलण्याचे २०० रुपये असा एकूण ७०० रुपये दंड एकावेळी चालकाकडून वसूल करण्यात येतो.

हेही वाचा >>> ठाणे: कशेळी ते अंजुरफाट्यापर्यंतचा प्रवास नकोसा; रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेसाठी काही दिवस एकच वाहन कार्यरत राहणार आहे. पंधरा दिवसांनी डोंबिवली पश्चिमेसाठी स्वतंत्र टोईंग वाहन दाखल होणार आहे. एक वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील एकूण ३८ टोईंग वाहन न्यायालयीन प्रकरणे, शासनाकडील तक्रारींमुळे वाहतूक विभागाने बंद केल्या होत्या. हा तिढा सुटल्याने टोईंग वाहन नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> ठाणे आणि भिवंडी शहरात दहा टक्के पाणी कपात; १० नोव्हेंबरपर्यंत पाणी कपात लागू राहणार

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पी. पी. चेंबर्समध्ये खासगी, राजाजी रस्त्यावर रेल्वेचे वाहनतळ आहे. बाजीप्रभू चौकातील चिमणी गल्लीमध्ये पाटकर प्लाझा संकुलात वाहनतळ आहे. त्याचा वापर अद्याप पालिकेकडून सुरू करण्यात आलेला नाही. हा वाहनतळ सुरू करावा म्हणून मागील पाच वर्षापासून आरटीओ, वाहतूक अधिकारी पालिकेकडे तगादा लावून आहेत. परंतु, काही राजकीय हस्तक्षेप या प्रकरणामध्ये होत असल्याने हे प्रकरण लटकले असल्याचे कळते. डोंबिवली पश्चिम व्दारका हाॅटेल समोर एकमेव रेल्वेच्या जागेत वाहनतळ आहे. डोंबिवलीत पालिकेची प्रशस्त वाहनतळ सुविधा रेल्वे स्थानक भागात नसल्याने नोकरदारांना रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्ली बोळात वाहने उभी करुन कामावर जावे लागते. नोकरदारांची गैरसोय नको म्हणून वाहतूक विभागाने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर सम, विषम तारखांना वाहन चालकांना दुचाकी उभी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली : ठाकुर्ली पुलाखाली पेव्हर वाहनाची तीन चारचाकी वाहनांना धडक

ही सुविधा उपलब्ध करुन देऊनही अनेक नागरिक ना वाहनतळ क्षेत्रात वाहने उभी करुन वाहन कोंडी करतात. गेल्या दीड वर्षापासून टोईंग वाहन शहरात नसल्याने वाहन चालकांची वाहने कोठेही उभी करण्याची स्पर्धा लागली होती. टोईंग वाहन सुरू झाल्याचे समजताच एका लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्याने टोईंग वाहन ठेकेदाराला संपर्क करून तुम्ही टोईंग वाहन कसे काय सुरू करता म्हणून अरेरावी केली होती. ही माहिती लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात समजातच संबंधित कार्यकर्त्याची कार्यालय प्रमुखाकडून कानउघडणी करण्यात आली.

फुकटे अधिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली घाऊक बाजारपेठेचे ठिकाण नाही. या शहरात बाहेरुन प्रवासी वाहतुकी व्यतिरिक्त अन्य मालवाहू वाहने येत नाहीत. बहुतांशी वाहने स्थानिक असतात. बाहेरच्या शहरातून वाहन आली तर ती कोठेही उभी केली जातात. तशी परिस्थिती डोंबिवलीत नाही. डोंबिवलीत टोईंग वाहन माध्यमातून वाहन ताब्यात घेतले की तात्काळ लोकप्रतिनिधी, वरिष्ठांना संपर्क करुन कारवाई झालेला वाहन चालक संपर्क करुन फुकटात वाहन सोडून घेण्याला प्राधान्य देतो, अशी माहिती कारवाई पथकाने दिली.