अंबरनाथः अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे अंबरनाथ पूर्वेतील रेल्वे स्थानकापासून, स्वामी समर्थ चौक, गोविंद तीर्थ पूल आणि आसपासच्या भागात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक विभागाने येथील वाहतुकीचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार २५ फेब्रुवारी सायंकाळपासून ते गुरूवार २७ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीत बदल असतील. त्यामुळे मंदिराच्या दिशेला प्रवास करताना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

अंबरनाथचे शिलाहारकालीन शिव मंदिर हे जिल्ह्यातील भाविकांचे मोठे केंद्र आहे. दरवर्षी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. वर्षानुवर्षे महाशिवरात्रीला अंबरनाथमध्ये जत्रा भरत असते. ठाणे जिल्ह्यासह, रायगड, पालघर, मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शिवमंदिर परिसरात मोठी गर्दी होत असते. गेल्या वर्षापासून या भागात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प सुरू आहे. त्यात घाट उभारणीपासून विविध कामे केली जात आहेत. येथील चेहरामोहरा बदलत असून त्यामुळे भाविकांचा ओघही मंदिराकडे वाढला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने शिवमंदिर परिसर आणि अंबरनाथ पूर्वेतील भागामध्ये वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबद अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार वाहनचालकांनी याची नोंद घेऊनच प्रवास करावा असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

वाहतूक बदल असे

पूर्वेतील लोकनगरी हिंदु स्मशानभूमीकडून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हिंदु स्मशानभूमी येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. पर्यायी मार्गाने  ही वाहने सरळ वडवली सेक्शनमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हुतात्मा चौकाकडुन मटका चौकातुन मार्गे इच्छित स्थळी जातील. तर काटई कर्जत मार्गावरून वैभव हॉटेलकडून अंबरनाथ रेल्वे स्थानकमार्गे मटका चौकापर्यंत येणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना वैभव हॉटेल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.

ही वाहने वैभव हॉटेल येथून आनंदनगर एमआयडीसी, टी जंक्शन, फॉरेस्ट नाका, लादीनाका, डीएमसी चौक, मटका चौक, अंबरनाथ पश्चिम येथून पुढे इच्छित स्थळी जातील. तर अंबरनाथ बदलापुर औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ने आण करणाऱ्या बस या एमआयडीसी ते टी पॉईंटमार्गे, फॉरेस्ट नाक, डी.एम.सी. चौक मार्गे गांधी चौक येथे कामगारांना रेल्वे स्टेशनकडे जाणाकरीता सोडून परत त्याच मार्गे इच्छित स्थळी जातील. मटका चौकाकडुन हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या सर्व जड अजवड वाहनांना मटका चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही सर्व जड अवडज वाहने ही लादीनाक, फॉरेस्ट नाका, टी पॉइंट, वैभव हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी व शिवाजीनगरकडून येणाऱ्या हलक्या वाहनांना रोटरी क्लब येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. तर कैलास कॉलनी, उल्हासनगर नं. ५ कडून स्वामी समर्थ चौक, अंबरनाथपर्यंत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कैलास कॉलनी येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. ही वाहने कैलास कॉलनी येथून पालेगांव मार्गे किंवा सुभाष टेकडी, उल्हासनगर नं.४ कानसई मार्गे इच्छित स्थळी जातील.