Navratri mandap causing massive traffic jam in thane ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाच्या असलेल्या टेंभीनाका चौकात नवरात्रौत्सवानिमित्ताने मंडप उभारण्याची कामास आज, सोमवारपासून सुरुवात झाली आहे. येत्या २२ सप्टेंबरला घटस्थापना असली तरी या मंडपाचे काम सुमारे दोन आठवडे सुरु राहणार आहे. टेंभीनाका परिसरात ठाणे न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, काही शासकीय कार्यालये आहेत. काही शाळा, महाविद्यालय या भागात आहेत. त्यामुळे या सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. कोंडीचा परिणाम रात्री सर्वाधिक होण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील टेंभीनाका येथे श्री जय अंबे माता सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी हा नवरात्रौत्सव सुरु केला होता. त्यावेळी ठाण्यात नागरिकरण तुलनेने कमी होती. परंतु आता ठाण्यात नागरिकरण वाढले आहे. मंडळाकडून आजही टेंभीनाका येथे नवरात्रौत्सव साजरा केला जातो. त्यासाठी टेंभीनाका चौकात नवरात्रौत्सवासाठी भव्य मंडप उभारण्यात येतो.
ठाणे, मुंबई, उपनगरासह विविध जिल्ह्यातून या उत्सवासाठी नागरिक टेंभीनाका येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. यावर्षी २२ सप्टेंबरला घटस्थापना असल्याने आजपासून येथे मंडप उभारणीचे काम मंडळाच्या वतीने हाती घेतले आहे. त्यामुळे टेंभीनाका चौकातून कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतुकीसाठी खुला असलेला मार्ग बंद करण्यात आला आहे.
टेंभीनाकापासून काही मीटर अंतरावर ठाणे न्यायालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक कामानिमित्ताने याठिकाणी येतात. शाळा-महाविद्यालय देखील या भागापासून काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे शाळेच्या बसगाड्यांची देखील येथून वाहतुक होते.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या प्रवासी आणि वाहन चालकांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. परंतु आता टेंभीनाका चौक बंद झाल्याने त्याचा परिणाम चरई, कोर्टनाका, आनंद आश्रम रस्ता येथे वाहतुक कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्सव ११ दिवस असला तरी मंडप उभारणी, दसऱ्यानंतर मंडप काढण्यासाठी लागणारा वेळ यामुळे महिनाभर तरी नागरिकांना कोंडीत अडकावे लागण्याची शक्यता आहे.
तात्पुरत्या स्वरुपात वाहतुक बदल
याबाबत वाहतुक पोलिसांना विचारले असता, तात्पुरत्या स्वरुपात येथे वाहतुक बदल लागू करण्यात आला आहे. टेंभीनाका चौकातील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.