कल्याण : कल्याण मधील दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूल दरम्यानच्या सर्वाधिक वर्दळीच्या गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची डावी मार्गिका नवीन रस्ते कामासाठी खोदून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालक मनमानी पध्दतीने या रस्त्यावरून वाहने चालवित असल्याने या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
बैलबाजार, गोविंदवाडी रस्ता परिसरातील अनेक नागरिक आपली मोटार, दुचाकी वाहने उलट मार्गिकेतून चालवून वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. या रस्त्याच्या मध्यभागी एकही वाहतूक पोलीस नसल्याने बेशिस्त वाहन चालक त्याचा गैरफायदा घेत आहेत. डोंबिवली, शिळफाटा येथून भिवंडीकडे जाण्यासाठी, भिवंडीतून शिळफाटाकडे जाणारी वाहने गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याने धावतात. कल्याण शहरातील शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बहुतांशी वाहन चालक या बाह्यवळण रस्त्याला प्राधान्य देतात. त्यामुळे गोविंदवाडी रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.
या रस्त्यावरून मोटारी, रिक्षा हलक्या वाहनांबरोबर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. मागील महिन्यापासून गोविंदवाडी वळण रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरचे काही गतिरोधक उंचवटे आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबले असल्याने या रस्त्याने जाताना वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज घेत, कसरत करत वाहन चालवावे लागते. खड्ड्यांमुळे संथगतीने वाहने धावत असल्याने या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
खड्डे, कोंडी सुरू असताना या रस्त्याची पत्रीपूल ते दुर्गाडीकडे जातानाची मार्गिका नवीन रस्ते कामासाठी खोदून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पत्रीपुलाकडून दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या वाहनांना मध्येच उजवे वळण घेऊन दुर्गाडी किल्ला येथून येणाऱ्या एक मार्गिकेत प्रवेश करावा लागतो. एका मार्गिकेतून येणारी जाणारी वाहने धावू लागली की या रस्त्यावर दुर्गाडी किल्ल्यापर्यंत कोंडी होत आहे. नोकरदार वर्ग, माल वाहतूकदार यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. काही ठिकाणी रस्त्याच्या मार्गिकेत अधिक प्रमाणात एकाच जागी अधिकचे खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने गोविंदवाडी रस्त्यावर तळे साचले आहे. या तळ्यातून वाहने नेण्यास कोणीही धजावत नाही. त्यामुळ या रस्ते मार्गिकेत वाहतूक कोंडी होत आहे.
लोखंडी सळईचा फटका
गोविंदवाडी रस्त्यावर मध्यभागी खोलगट खड्डा वाहन चालकाला दिसावा म्हणून काहींनी लोखंडी सळई खड्ड्यात पुरून ठेवली आहे. या सळईचे एक टोक रस्त्याच्या दिशेने आले आहे. रात्रीच्या वेळेत सुसाट वेगात असलेला दुचाकी स्वार या मार्गिकेतून गेला आणि त्याच्या ही सळई निदर्शनास आली नाहीतर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच, मोटार चालकाच्या ही सळई निदर्शनास आली नाहीतर सळई मोटारीच्या अंतर्गत भागात घुसून अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवेपर्यंत आणि या भागातील नवीन रस्ता पूर्ण होईपर्यंत या रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.