ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्याने झालेल्या अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतुक व्यवस्थेवर झाला आहे. बुधवारी सकाळी घोडबंदर येथील पातलीपाडा ते कापूरबावडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनातील तेल रस्त्यावर सांडल्याने वाहतुक मंदावली. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने निघालेल्या वाहन चालकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत आहे. गायमुख घाटातही एका अपघातामुळे वाहतुक कोंडी झाली.
ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहने तसेच उरण जेएनपीटी, भिवंडी येथून सुटणारी अवजड वाहने वसई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. याच मार्गावर मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली) आणि चार अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसविण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडीचा जाच नागरिकांना सहन करावा लागत असताना, पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसली. त्यामुळे त्या वाहनातील तेल रस्त्यावर सांडले. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. घोडबंदर मार्गावर सकाळपासून वाहतुक कोंडीचा सामना प्रवाशांना आणि वाहन चालकांना सहन करावा लागला.
वाहतुक कोंडीमुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने निघालेल्या वाहन चालकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत आहेत. ठाणे वाहतुक पोलिसांनी येथील एक अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. परंतु दुसरे वाहन बाजूला करणे शक्य झाले नाही. त्यामुळे वाहतुक मंदावली आहे. वाहतुक कोंडी झाल्याने प्रवाशांना आणि वाहन चालकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.
दरम्यान, बुधवारी गायमुख घाटामध्येही एक अपघात झाला. गायमुख घाटात एक अवजड वाहन दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेकडील वाहिनीवर गेला. त्यामुळे या मार्गावरही वाहतुक कोंडी झाली आहे. येथील रस्ता खराब असल्याने दररोड वाहतुक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यातच अपघात झाल्याने प्रवासी आणि नोकरदारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गायमुख घाटात चेना पूल ते फाऊंट हाॅटेल चौकाच्या पुढे वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे वसई-विरार भागातून ठाण्यात प्रवास करणाऱ्या चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.