ठाणे : नौपाडा-पाचपाखाडी असो की वर्तकनगर-वागळेचा परिसर… येथील गगनचुंबी इमारतींमधील घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर केव्हाच गेल्या आहेत. त्यामुळे कापूरबावडी नाक्याच्या पलिकडे, अगदी गायमुखच्या टोकापर्यंत पसरलेल्या नव्या ठाण्याने स्वस्त घरांच्या शोधात निघालेल्या बहुसंख्यांना ‘ठाणेकर’ होऊन राहण्याची संधी दिली. मात्र घोडबंदर मार्गावरील रोजच्या वाहतूक कोंडीमुळे हे ‘ठाणेकर’ मिरविणे या मंडळींना नकोसे वाटू लागले आहे.

ठाण्यात तुलनेने स्वस्त घरांच्या खरेदीचा मार्ग हा घोडबंदरच्या दिशेनेच जातो. नौपाडा, पाचपाखाडीचे जुने ठाणे कितीही दाटीवाटीचे असले तरी येथे सहाशे फुटांच्या घरासाठीही दीड-दोन कोंटीचा आकडा मोजावा लागतो. पुर्व द्रुतगती महामार्गाच्या एका बाजूस असलेल्या वागळे, वर्तकनगरचा पट्टा गगनचुंबी इमारती आणि महागड्या घरांसाठी अधिक चर्चेत आहे. वर्तकनगर, समतानगर, शिवाईनगर या भागात नव्या इमारतींमध्ये स्वस्त घरांचा पर्याय फारसा राहीलेला नाही. याठिकाणी एखाद्या जुन्या इमारतीत घर घ्यावे लागलेच तर पार्किग आणि लिफ्टसारख्या सुविधा नसतात. त्यामुळे लोकमान्यनगर, किसननगर, यशोधननगर, फुलेनगर, सावरकरनगर यासारख्या दाटीवाटीच्या वस्त्यांमधून मोकळ्या ढाकळ्या वसाहतींच्या शोधात असलेल्या ‘ठाणेकरां’ना हल्ली घोडबंदर मार्गाचा पर्याय उपबल्ध झाला. कोलशेत, कासारवडवली, विजयनगरी, ओवळा, गायमुख या भागांत ४००-५०० चौरस फुटांची घरे ५५ ते ६५ लाखांत मिळतात. त्यामुळे ‘महागड्या’ ठाण्याऐवजी घोडबंदरमध्ये घर खरेदी करायचे आणि ‘ठाणेकर’ बनून रहायचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे इस्टेट एजंट अनिरुद्ध त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून घोडबंदर भागातील सततच्या कोंडीमुळे स्वस्त घरांचा पर्याय नकोसा वाटणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही त्यांनी मान्य केले. घोडबंदरची कोंडी कधी फुटणार, असा प्रश्न विचारत आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढल्याचे एका बड्या विकसकाच्या पणन व्यवस्थापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. घोडबंदरची कोंडी अशीच राहीली तर इथले भाड्याची रक्कम कमी होईल, अशी भीती या क्षेत्रात काम करणारे सुजय तेली यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>घोडबंदरमधील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या

त्यापेक्षा बदलापूर काय वाईट?

ठाणे स्थानकापासून घोडबंदरच्या कोलशेत, कासरवडवली येथे रिक्षा, बस किंवा खासगी वाहनाने जाण्यासाठी एका तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. शनिवार-रविवारीही परिस्थिती वेगळी नसते. सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत तर भयावह परिस्थिती असते. त्यामुळे येथे राहण्यापेक्षा डोंबिवली, कल्याण, बदलापूरपर्यंत रेल्वेचा प्रवास काय वाईट, अशी प्रतिक्रिया या भागात रहाणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न

घोडबंदर मार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे तेथील भागातील तीन-चार नागरिकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात आले होते. परंतु मुख्यमंत्री निवासस्थानी नव्हते. शिंदे यांची भेट होत नाही तोपर्यंत तेथेच थांबण्याची भूमिका या नागरीकांनी घेतली आहे. दरम्यान, पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्रित येऊन आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी शिष्टमंडळाला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला नाही, तर रास्ता रोको करण्याचा इशारा या नागरिकांनी दिला आहे.