अंबरनाथ: काटई अंबरनाथ राज्य मार्गावर शनिवारी ही वेगवेगळ्या ठिकाणी अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. काटईपासून कोळेगाव, खोणी फाटा, नेवाळी नाका आणि अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर मोठी कोंडी झाली. त्यामुळे वाहन चालकांना शनिवारीही नाहक त्रास सहन करावा लागला. यात नेवाळी नाक्यावर बेशिस्त वाहन चालक आणि वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतूक पोलीसही हतबल झाल्याचे चित्र होते.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्हा कोंडीत अडकतो आहे. विविध ठिकाणी पडलेले खड्डे, अपूर्ण जोड रस्ते, रस्त्यांचे सुरू असलेले काम यामुळे कोंडी होते आहे. उड्डाणपूलांची अरुंदताही या कोंडीला कारणीभूत ठरते आहे. त्यात बदलापूर, अंबरनाथ शहरातील प्रवाशांना ठाणे, मुंबई, नवी मुंबई, डोंबिवली या शहरांशी जोडण्यासाठी महत्त्वाचा असलेला काटई अंबरनाथ राज्यमार्ग शनिवारी ही कोंडीत सापडला. या राज्यमार्गावर काटई नाक्यापुढे अंबरनाथच्या दिशेने येणाऱ्या मार्गीकेवर कोळेगाव, खोणी फाटा, नेवाळी नाका आणि अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे प्रत्येक कोंडीच्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोळेगाव येथे चौकात वाहने वळण घेत असल्याने सातत्याने कोंडी होत होती. या चौकात अनेक अतिक्रमणे आहेत अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात त्यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पुढे खोणी येथे तळोजा, पनवेल या भागातून येणारी अवजड औद्योगिक वाहने वळण घेतात. या चौकात शेजारी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुद्धा झालेले आहे. त्यामुळे येथे वाहनांची कोंडी होते. पुढे म्हाडा वसाहतीशेजारी रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. पावसामुळे येथे खड्डे पडले असल्याने येथे वाहने संथ गतीने चालतात. परिणामी मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. शनिवारी ही येथे हीच स्थिती निर्माण झाली होती.
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका हा गेल्या काही वर्षांपासून कोंडीचे केंद्र ठरतो आहे. अपुरा चौक, अरुंद होणाऱ्या मार्गिका, अंबरनाथहून मुंबई ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येजा करणारी वाहने आणि कल्याणहून मलंगगडाच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने एकाच ठिकाणी येत असल्याने मोठी कोंडी होते आहे. येथे बेशिस्त वाहनचालक आणि कडेला असलेल्या वाहनांमुळे कोंडीत भर पडते आहे. शनिवारी ही येथे अभूतपूर्व कोंडी झाली. नेवाळी नाका येथे वाहने जागच्या जागी थांबून होती. त्यामुळे अंबरनाथ होऊन येणारी मार्गिका आणि काटई वरून येणारी मार्गिका दोन्हीही बंद झाल्या होत्या. परिणामी काटईवरून येणाऱ्या वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवली. त्यामुळे दोन्ही मार्गिका बंद पडल्या. अंबरनाथ – नेवाळी या मार्गीकेवर आधीच विविध ठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावरही अशीच काहीशी स्थिती होती. येथेही वाहने वळण घेताना बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठी कोंडी झाली होती. त्याचा फटका प्रामाणिक वाहन चालकांना बसला. अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांच्या प्रवासासाठी शनिवारी दीड ते दोन तास खर्ची घालावे लागले.