ठाणे : गायमुख घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम शुक्रवारी पहाटेपासून सुरु झाले. त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी वाहतुक व्यवस्थेवर बसला. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील कौसा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अवजड वाहतुकीमुळे नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या नोकरदारांना अवघ्या १० ते १५ मिनीटाच्या अंतरासाठी एक तास लागत होता. शनिवारी रक्षा बंधन असल्याने अवजड वाहनांचा भारही वाढला होता. दिवसभर झालेल्या या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले.

घोडबंदर येथील गायमुख घाटातील रस्त्याची अवस्था वाईट झाल्याने येथील वाहन चालक त्रस्त झाले आहेत. घोडबंदर घाट रस्त्यावरून हजारो अवजड वाहने उरण येथील जेएनपीए बंदरातून घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. या वाहनांसाठी मुंब्रा बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे. शुक्रवारपासून घोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील वाहतुकीवर बसला.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून अवजड वाहनांची वाहतुक खारेगाव टोलनाका मार्गे मुंबई नाशिक महामार्गाने भिवंडी येथून वळविण्यात आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यात या अवजड वाहनांचा भार वाढल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ७ वाजेपासून खारेगाव टोलनाका ते मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील कौसा पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. दुपारी ३ नंतरही वाहतुक कोंडी सुटली नव्हती. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

अवघ्या १५ ते २० मिनीटाच्या अंतरासाठी वाहन चालकांना एक तास लागत होता. अवजड वाहनांच्या कोंडीमुळे नवी मुंबई, महापे, डोंबिवली येथून ठाणे, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या नोकरदार, चालक आणि प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी गायमुख घाटात जाऊन रस्त्याच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.