तीन हात नाका परिसरात ट्रक उलटला

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याने ठाण्यातील महामार्गावर आठ दिवसांपासून पुन्हा कोंडी होऊ लागली आहे. महामार्गावर बुधवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे १५ मिनिटांच्या अंतरासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ लागल्याने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले. मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका परिसरात बुधवारी दुपारी ट्रक उलटल्याने या मार्गावरील आनंदनगर चेकनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील कोंडीत आणखी भर पडल्याचे चित्र दिसले.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलाच्या कामामुळे या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या मार्गावर वाहनांचा भार वाढल्याने ठाणे तसेच भिवंडी परिसर कोंडीच्या विळख्यात सापडला. दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह विविध प्रकारच्या भेटवस्तूंना बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे जेएनपीटी बंदरातून अशा वस्तूंची भिवंडीतील गोदामांच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढली आहे. त्याचबरोबर गोदामांमधून शहरातील अन्य भागांत अशा वस्तूंची वाहतूक करण्यात येत असून या वाहनांचाही आकडा मोठा आहे. अशा वाहनांच्या संख्येत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून मुंब्रा, शीळफाटा, खारेगाव, मानकोली, राजनोली, भिवंडी या परिसरात कोंडी होऊ लागली आहे. या भागात बुधवारी झालेल्या कोंडीत अनेक जण अडकून पडले होते. शीळफाटा येथून मानकोली-कामण रोड मार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्गापर्यंतच्या प्रवासासाठी अवजड वाहनांना सव्वा तास लागतो. मात्र, या कोंडीमुळे हे अंतर गाठण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागत आहे. तसेच मानकोली ते खारेगावपर्यंतच्या अंतरासाठी पंधरा मिनिटे लागतात. मात्र त्या अंतरासाठी आता एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो.

  • मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवाडा, खारेगाव टोलनाका, मानकोली आणि रांजनोली हा परिसर कोंडीच्या विळख्यात सापडला असला तरी शहरात मात्र वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.

 

शहरातील नऊ मार्गावरील ‘परिवहन’च्या फेऱ्यांमध्ये वाढ

३५ नव्या बस गाडय़ांमुळे प्रवाशांना दिलासा

ठाणे : केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून ठाणे परिवहन सेवेमध्ये ३५ नव्या बसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या बसेस आजपासून (गुरुवार) ठाणे स्थानकातून लोकमान्य नगर, गुरुकुल सोसायटी, निळकंठ टॉवर्स, साकेत या मार्गासह मुंब्रा ते शिळफाटा, किसनगर ते कळवा नाका आदी नऊ मार्गावरून धावणार आहेत. या परिवहन सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नव्या बस या मार्गावर..

  • कोरस, वर्तकनगर, कॅडबरी, तीन हात नाका, हरिनिवास.
  • तलावपाळी, चरई, अल्मेडा रोड, मनपा भवन, नितीन कंपनी रस्ता, गुरुकुल सोयायटी, हरिनिवास, आईस फॅक्टरी, ठाणे
  • हरिनिवास, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, वर्तकनगर, देवदया नगर, कॉसमॉस मार्गे निळकंठ टॉवर्स.
  • हरिनिवास, एस. टी. वर्कशॉप, प्रताप सिनेमा, नारळीपाडा, विकास कॉम्प्लेक्स, केव्हीला, कोर्टनाका, ठाणे (सॅटीस)
  • तलावपाळी, सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस लाइन, विकास कॉम्प्लेक्स, नारळीपाडा, प्रताप सिनेमा, मखमली तलाव, सोपान सोसायटी, हरिनिवास, ठाणे स्थानक.
  • आईस फॅक्टरी, हरिनिवास, प्रदीप सोसायटी, गुरुकुल सोसायटी, नितीन कंपनी सेवा रोड, पुंजानी इस्टेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्टनाका, जांभळीनाका, ठाणे स्टेशन.
  • आईस फॅक्टरी, आयकर भवन, नितीन कं., कॅडबरी जंक्शन, माजिवडा नाका, कापूरबावडी, बाळकुमनाका, जलारामबाप्पा मंदिर, साकेत कॉम्प्लेक्स
  • मुंब्रा शिवमंदिर, अमृतनगर, कौसा, भारतगिअर्स, शिळफाटा.
  • आंग्रे चौक, आरटीओ कोर्टनाका, ठाणे सॅटीस, आयकर भवन, जॉन्सन कंपनी, ठाणे क्लब (रहेजा गार्डन, संकल्प चौक, (रघुनाथनगर) रायलेश्वर मंदिर, एमआयडीसी, रोड नं. १६, बलसारा कंपनी.