डोंबिवली – रस्ते सुरक्षेचा भाग म्हणून डोंबिवली वाहतूक विभागाने गुरूवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर खासगी, पर्यटन खासगी लांब पल्ल्यांच्या बसच्या चालकांची अचानक तपासणी मोहीम राबवली. यावेळी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या, वाहनाची आवश्यक कागदपत्रे सोबत न ठेवता प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन मालक, चालकांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली.

डोंबिवली पूर्व भागातील फडके रस्त्यावरून दररोज डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, तळोजा परिसरात औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी यांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या बस धावतात. याशिवाय पर्यटन कंपन्यांच्या लांब पल्ल्याच्या बस सकाळी या रस्त्यावरून धावतात. डोंबिवली शहर परिसरातील विविध गृहसंकुलांच्या बस प्रवाशांची नेआण करण्यासाठी या रस्त्यावरून धावतात.

रस्ते सुरक्षेचा भाग म्हणून शुक्रवारी सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली फडके रस्त्यावरून धावणाऱ्या सर्व खासगी, परिवहन सेवांच्या बसच्या चालकांची श्वास विश्लेषक तपासणी (ब्रेथ ॲनालायझर) करण्यात आली. या तपासणीत जे चालक दोषी आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईच्यावेळी या रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी, रिक्षा चालक यांचीही तपासणी करण्यात आली. ही तपासणी सुरू असताना किरकोळ त्रृटी निघून आपण वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अडकायला नको म्हणून अनेक वाहन चालकांनी माघारी फिरून फडके रस्त्याऐवजी पर्यायी रस्ते मार्गाने रेल्वे स्थानक, मानपाडा रस्ता किंवा अन्य इच्छित स्थळी जाणे पसंत केले.

फडके रस्त्यावर वाहतूक पोलिसांची पथके श्वास विश्लेषक यंत्र घेऊन आगरकर छेद रस्ता, आप्पा दातार चौक, मदन ठाकरे चौक भागात वाहन चालकांची त्याने मद्य सेवन केले आहे का याची तपासणी करत होते. सकाळीच सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे रिक्षा, दुचाकी स्वार, बस चालकांची तारांबळ उडाली होती. या तपासणीत वाहन चालकांच्या विमा, परवाना नुतनीकरण, प्रदूषण नियंत्रण प्रणालीची कागदपत्रे तपासण्यात आली. या तपासणी मोहिमेमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. अशाप्रकारच्या तपासणी मोहिमा दर आठवड्याला वाहतूक पोलिसांना केल्या पाहिजेत, अशी मते प्रवासी व्यक्त करत होते.

वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात आठवड्यातून दोन ते तीन वेळा संयुक्तपणे वाहन तपासणी, श्वास विश्लेषक तपासणी मोहीम राबवावी यामध्ये अनेक रिक्षा चालक, दुचाकी स्वार मद्य सेवन केलेले आढळतील, असे प्रवाशांनी सांगितले. रात्रीच्या वेळेत बहुतांशी रिक्षा चालक मद्य सेवन करून वाहने चालवित असल्याच्या तक्रारी आहेत.