Thane upvan lake overflow ठाणे – गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तलावांचे शहर म्हणून ओळखला जाणाऱ्या ठाण्यातील अनेक तलावात पाण्याचा साठा वाढलेला आहे. विशेषतः येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव पावसामुळे तुडुंब भरला असून पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे उपवन तलावाकडून जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

उपवन तलाव हा ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील एक महत्त्वाचा पर्यटन आणि विश्रांतीचे ठिकाण आहे. हा तलाव येऊनच्या पायथ्याशी आहे. दररोज शेकडो नागरिक या तलावाच्या काठावर फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येतात. मात्र, गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओसांडून वाहू लागला आहे. यामुळे या पाण्याचा प्रवाह रस्त्यावर आल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची गैरसोय झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केली. वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यातील अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचल्याची समस्या निर्माण झाली आहे. उपवन तलावाजवळील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तलाव परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उपवन तलावासह शहरातील नालेही तुडुंब भरून वाहत होते. दरम्यान ठाणे शहरातील नाल्यांनाही नदीचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. पावसासोबत सोसाट्याचा वारा असल्याने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा भाग पडला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर, घोडबंदर तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला. यासोबतच मुंबई उपनगरातील ठिकठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी उसळली होती. त्याचप्रमाणे, रस्ते कामादरम्यान वीज पुरवठा खंडीत झाल्याने ठाणे महापालिका परिवहन उपक्रम ( टिएमटी) च्या विद्युत बसगाड्यांची चार्जिंग सुविधा ठप्प झाली. यामुळे सकाळच्या वेळेत १२३ विद्युत बसगाड्यांपैकी जेमतेम ३१ बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी आगाराबाहेर पडल्या. ठाण्याची लाईफलाईन असलेल्या टिएमटीची बससेवा कोलमडून पडल्याने सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचे हाल झाले.