लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे प्रवेशव्दारावर अनेक रिक्षा चालक पहाटेपासून प्रवेशव्दार अडवून प्रवासी वाहतूक करतात. यासंबंधीच्या तक्रारी डोंबिवली वाहतूक विभागाकडे आल्यानंतर शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून वाहतूक पोलीस डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्व, पश्चिम प्रवेशव्दारावर तैनात होते. त्यामुळे रेल्वे प्रवेशव्दारांवर परिसर मोकळा होण्याबरोबरच या भागात रिक्षाचालक शिस्तीने प्रवासी वाहतूक करताना दिसून आले.

डोंबिवलीतील बहुतांशी नोकरदार, व्यावसायिक पहाटेपासून डहाणू, वापी, अलिबाग, मुंबई परिसरात जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात पहाटे येतात. विद्यार्थी महाविद्यालयात जाण्यासाठी येजा करतात. काही नोकरदार आपल्या घरातील सदस्यासह दुचाकी, चारचाकी वाहनाने रेल्वे स्थानक भागात येतात. रिक्षा चालक रेल्वे प्रवेशव्दार, रस्ता अडवून प्रवासी वाहतूक करतात. यामुळे पहाटेच्या वेळेत रेल्वे स्थानक भागात खासगी वाहने घेऊन येणाऱ्या चालकांना तेथून वाहन नेणे शक्य होत नाही. या रिक्षा चालकांना खासगी वाहन चालकाने रिक्षा बाजुला करण्याची सूचना केली तर रिक्षा चालक उध्दट बोलत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वाढल्या होत्या. डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी रिक्षा चालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता पहाटे पाच वाजल्यापासून डोंबिवली रेल्वे स्थानक भागात गस्त ठेवली. वाहतूक पोलीस सकाळीच गस्तीवर असल्याने रेल्वे प्रवेशव्दार अडविणारे रिक्षा चालक शिस्तीने रिक्षा वाहनतळावर उभे राहून व्यवसाय करत होते.

आणखी वाचा-डोंबिवलीत पदपथ अडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई, पदपथावरील सायकली, हातगाड्या जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चुकून एखादा रिक्षा चालक प्रवेशव्दारापर्यंत आला तर त्याला समज देऊन तेथून माघारी पाठविले जात होते. वाहतूक पोलिसांच्या या अचानकच्या कारवाईने रिक्षा चालकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली होती. पहाटेच्या वेळची ही गस्त कायम ठेवील जाणार आहे. जे रिक्षा चालक रात्री, अपरात्री वाहनतळ सोडून रेल्वे प्रवेशव्दार, जिन्याजवळ रस्ता अडवून उभे असतील. अशा चालकांची सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून माहिती जमा करुन अशा रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे. जे रिक्षा चालक सातत्याने नियमभंग करत असतील त्यांचे प्रस्ताव आरटीओकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे एका एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.