ठाणे: ठाणे पोलीस दलात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नौपाडा, शिळडायघर, चितळसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सामावेश आहे. सहा पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले.

ठाणे पोलीस दलात सर्वात जुन्या पोलीस ठाण्यांपैकी नौपाडा पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत नौपाडा, गोखले रोड, राम मारूती रोड, पाचपाखाडी यासह महत्त्वाचा व्यापारी आणि जुन्या ठाण्यातील वस्तीचा भाग येतो. शिळ -डायघर भागात मोठ्याप्रमाणात गोदामे आणि कारखाने आहेत. चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंत विहार, टिकूजीनीवाडी यांसारख्या उच्चभ्रू वस्तीचा सामावेश होतो. त्यामुळे हे तीनही पोलीस ठाण्यांना शहर पोलीस दलातील महत्त्वाची पोलीस ठाणे मानले जाते. सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले.

हेही वाचा… ठाण्यात जलमापके चोरीचे प्रकार सुरूच, गेल्या पाच वर्षांत १५४१ जलमापकांची चोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर त्यांच्या रिक्त जागी शहर वाहतूक शाखेचे रविंद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविंद्र क्षीरसागर यांनी काहीवर्ष नौपाडा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले होते. शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर अतिक्रमण विभागाचे संदिपान शिंदे यांची शिळ-डायघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. चितळसर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अंजली आंधळे यांची शहर वाहतुक शाखेत बदली झाली. तर वागळे इस्टेट वाहतुक शाखेच्या चेतना चौधरी यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागात बदली झाली आहे. येत्या दोन दिवसांत आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.