उल्हासनगरः उल्हासनगर शहातील शहाड रेल्वे स्थानक परिसरात अरूंद रस्ता आणि बेकायदा पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असून त्यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाने स्थानकाबाहेरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर आणि कोणार्क रेसिडेन्सीपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना नो पार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर स्थानकाशेजारी शिवाजी रस्त्यावर सम विषम पार्किंगचा प्रयोग राबवला जाणार आहे. ३० दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी केली जाणार असून त्यानंतर सूचनांनुसार कायमस्वरूपी याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे येथील कोंडी फुटण्याची आशा आहे.
उल्हासनगर शहरातील शहाड रेल्वे स्थानक आणि परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. येथे असलेला कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरचा अरूंद उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाच्या खालून उल्हासनगरच्या सी ब्लॉक परिसरात येजा करता येते. याच उड्डाणपुलाच्या खाली रिक्षा थांबा, हातगाड्या, पार्किंग केली जाते. याच भागात शिवाजी रस्त्यावरून गोल मैदान, गजानन बाजार आणि फर्निचर बाजारात जाता येते. याच रस्त्यावर सर्वात मोठी बाजारपेठ सुद्धा आहे. तसेच शेजारी रहिवासी क्षेत्र असल्याने येथे कायम नागरिकांची गर्दी असते.
या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कोंडी होते आहे. त्यामुळे या भागातील कोंडी फोडण्यासाठी विविध निर्णय घेतले गेले. काही दिवसांपूर्वी येथील उड्डाणपुलाखालील अनधिकृत पार्किंग हटवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी पालिकेत विशेष बैठक घेऊन वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पाऊले उचलली होती. त्यानंतर आता शहाड स्थानक परिसरात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
शहाड रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा फुले चौक ते शहाड रेल्वे स्टेशन चौक या रोडवर दोन्ही बाजुला मोठया प्रमाणात दुचाकी चारचाकी वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केल्या जातात. त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूंना सम विषम पार्किंगचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शहाड स्थानकाच्या डाव्या बाजुला पालिका बस स्थानकापर्यंत, उजव्या बाजुला कोणार्क रेसिडेन्सीपर्यंत तसेच महादेव मंदिरापासून कोटक महिंद्रा बॅक एटीएम आणि लक्ष्मी मेडीकलपासून कोणार्क रेसीडेन्सीपर्यंत वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. येथे नो पार्किंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला होणारी पार्किंग कमी होऊन व्यापला जाणारा रस्ता मोकळा होणयास मदत होणार आहे.
याबाबत नुकतीच अधिसूचना जाहीर करण्यात आली असून ३० दिवस प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अधिसूचनेबाबत काही हरकती किंवा सुचना असल्यास त्या लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त, शहर वाहतुक शाखा यांच्याकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.