बदलापूरः बदलापूर शहरात लवकरच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीला तत्वतः मंजुरी दिली आहे. या कार्यालयासाठी लागणारा जागेचा प्रस्ताव सादर करून नगर पालिकेकडून जागा ताब्यात घ्यावी, त्यासाठी निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले आहे. आमदार किसन कथोरे यांनी कल्याण उपप्रादेशिक कार्यालयावरील भार कमी करण्यासाठी आणि बदलापूर, अंबरनाथच्या नागरिकांना फेरा वाचावा यासाठी या कार्यालयाची मागणी केली होती.

बदलापूर, अंबरनाथ या शहरांसोबतच आसपासच्या भागाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. पर्यायाने या भागातील वाहनांची संख्याही वाढली आहे. दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, माल वाहतूक करणारी वाहने अशा अनेक वाहनांसह अनुज्ञप्तीसह परवान्यांची अनेक कामे करण्यासाठी उप प्रादेशिक कार्यालयात जावे लागते. सध्याच्या घडीला कल्याण येथे उपप्रादेशिक कार्यालय आहे. वाहनचालकांच्या फेऱ्या कमी करण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी उप प्रादेशिक कार्यालयाची मागणी केली होती. बदलापूर शहरात उपप्रादेशिक कार्यालय झाल्यास त्याचा अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह आसपासच्या वाहनचालकांनाही फायदा होईल. तसेच एकाच कार्यालयावरीवल अवलंबित्व सुद्धा कमी होईल. मात्र या प्रस्तावावर ठोस कार्यवाही केली जात नव्हती.

सोमवार पावसाळी अधिवेशनच्या निमित्ताने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधान भवनातील दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीतही आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मंजुरीचा विषय मांडला. त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कार्यालयाला तत्तःव मंजुरी दिली. या परिवहन कार्यालयासाठी लागणारी आवश्यक जागा हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिल्या. त्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल. तसेच त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून दिला जाईल, असे आश्वासनही सरनाईक यांनी यावेळी दिले. तसेच बदलापुरात स्वयंचलित वाहन चाचण केंद्र आणि वाहन चालक पथ सुरू करण्याच्या सूचनाही यावेळी सरनाईक यांनी दिल्या.

या बैठकीसाठी आमदार किसन कथोरे यांच्यासह परिवहन सचिव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवर, कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकूल, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या कार्यालयाचा फायदा काय

बदलापूर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय होणार असल्याने आता वाहन धारकांना अनुज्ञती, त्याचे नुतनीकरण, परवाना काढणे, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, नवा नंबर घेणे आणि वाहनासंबंधी इतर सर्व कामे बदलापूर शहरातच करता येणार आहेत. त्यामुळे कल्याणचा फेरा कमी होण्यासोबतच रांगा लावण्यापासून वाहनचालकांना सुटका मिळणार आहे. याचा बदलापूर, अंबरनाथ शहर तसेच अंबरनाथ ग्रामीण आणि मुरबाड तालुक्यातील वाहनचालकांनाही फायदा मिळणार आहे.