ठाणे : जनतेने राजन विचारे यांची कपड्यांनिशी हाकालपट्टी केली. लोकसभा निवडणूकीत नरेश म्हस्के यांनी त्यांचा प्रंचड मताने पराभव केला. तेव्हापासून त्यांचे मन चल-बिचल झाले आहे अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांच्यावर केली.मिरा भाईंदर येथील मराठी एकिकरण समितीच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पोहचले असताना त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. तसेच, त्यांच्या दिशेने पाण्याची बाटली देखील भिरकावण्यात आली होती. तसेच माजी खासदार राजन विचारे यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
सोमवारी त्यांनी सरनाईक यांना एक पत्र देखील लिहीले होते. हे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. सरनाईक हे कासारवडवली येथील उड्डाणपूलाच्या लोकार्पणास आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी सरनाईक यांनी राजन विचारे यांच्यावर टीका केली. जनतेने राजन विचारे यांची कपड्यांनिशी हाकालपट्टी केली. लोकसभा निवडणूकीत आमचे नरेश म्हस्के यांनी त्यांचा प्रंचड मताने पराभव केला. तेव्हापासून त्यांचे मन चल-बिचल झाले आहे अशी टीका त्यांनी राजन विचारे यांच्यावर केली. तसेच, राजन विचारे यांच्या पत्राबाबत त्यांना विचारले असता, अशी पत्र मी वाचत नाही असे ते म्हणाले. तसेच त्यांना आयुष्यभर पत्र-पत्रच खेळायचे आहे. कारण, महापालिका निवडणूकीतही ते निवडून येऊ शकत नाही असा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा महामेरू त्यांच्या खांद्यावर घेतला आहे. आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहोत. परंतु त्यांना आंदोलन आणि घोषणाबाजी शिवाय काही येत नाही. मनसे आणि उबाठाला महापालिका निवडणूका झाल्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारचीच भूमिका घ्यावी लागणार आहे असेही ते म्हणाले.