कल्याण : नवीन प्रशस्त चकाचक रस्ते, नवीन भव्य उड्डाण पूल बांधले आणि त्यामुळे शासनावर मोठा खर्च पडला आहे. असे कोणतेही कारण नसताना शासनाने अचानक टोलकर वाढविल्याने उद्योजक, व्यावसायिक आणि वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लाडक्या बहिणींच्या पंधराशे रूपये आणि यासाठीच्या वाढीव रकमेसाठी हा टोलकर वाढविण्यात आला असल्याची टीका वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. तीन दिवसापूर्वी शासनाने टोलकरात वाढ केली आहे. यासंदर्भातच्या माहितीसाठी शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.
शासनाने लाडक्या बहिणींना जरूर वाढीव मानधन द्यावे, पण त्यासाठीचा भुर्दंड वाहतूकदारांना कशासाठी, असे प्रश्न वाहतूकदारांकडून केले जात आहेत. डोंबिवली ते नाशिक (गोंडे टोल प्लाझा) अंतरासाठी एका फेरीला १ हजार ४० रूपये टोलकर भरावा लागत असेल तर वाहतूकदारांनी प्रत्येक येण्याच्या जाण्याच्या फेरीसाठी या रस्त्यावर एकविसशे रूपये का मोजावेत. हा एका मार्गाचा प्रश्न झाला. अशाप्रकारे राज्यातील विविध महामार्गांवरून विविध भागातील मालवाहू वाहने धावत असतात. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा महसूल या टोलकराच्या माध्यमातून दैनंदिन जमा होणार आहे, अशी माहिती वाहतूकदारांनी दिली.
वाहतूकदार अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यासह परराज्यातील माल वाहतूक रस्ते मार्गाने बहुतांशी होते. उत्पादक, वाहतूकदार, उद्योजक, व्यावसायिक, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक अशी मोठी साखळी एका वाहतूकदाराच्या माध्यमातून जोडलेली असते. टोलकर वाढविल्यामुळे वाहतूकदार त्यांच्या मालवाहतुकीच्या भाडेदरात वाढ करणार. हा फटका उद्योजक, व्यावसायिक यांना बसणार. त्यामुळे उत्पादक आपल्या वस्तुंचे दर वाढविणार अशाप्रकारे एका वाढलेल्या टोलकरामुळे साखळीतील सर्व व्यावसायिकांना फटका बसणार आहे, असे डोंबिवली एमआयडीसीतील वाहतूकदार संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले.
राज्यातील रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे. या निकृष्ट रस्त्यांमुळे अनेक वेळा वाहतूकदारांची मालवाहू वाहने जागोजागी बंद पडतात. वाहनातील माल उद्योजक, व्यावसायिकाला वेळेत मिळाला नाहीतर त्यांचे आर्थिक नुकसान होते, असे वाहतूकदारांनी सांगितले. आगामी पालिका निवडणुकींचा विचार केला तर लाडक्या बहिणींना शासनाने एकविशसे नव्हे तर वाढुनही पैसे द्यावेत याविषयी कोणाचेही दुमत असणार नाही. त्यासाठी महसूल वाढीचे विविध स्त्रोत शोधावेत. त्यासाठी वाहतूकदारांना बळीचा बकरा करू नये आणि लाडक्या बहिणींचा वाढीव खर्च वाहतूकदारांच्या बोकांडी मारू नये, अशी भूमिका ज्येष्ठ उद्योजक आणि वाहतूकदार प्रदीप परूळेकर यांनी मांंडली. यासंदर्भात एक निवेदन लवकरच शासनाला देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील बहुतांशी मालवाहतूक रस्ते मार्गाने होते. वाहतूकदार अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. ८० टक्के व्यवहार या माल वाहतुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे शासनाने दिवाळीत कोणाला तरी खूष करायचे आहे म्हणून तो मानधनाचा बोजा वाहतूकदारांवर टोलकराच्या माध्यमातून लादू नये. – संदेश प्रभुदेसाई, वाहतूकदार.
वाहतूकदार, उद्योजक, व्यावसायिक अशी एक मोठी साखळी आहे. साखळीतील एक घटकावर आर्थिक बोजा पडला तरी साखळीतील इतर घटकांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे टोलकर वाढविला म्हणून केवळ वाहतूकदाराला नव्हे तर त्या साखळीतील सर्वांना त्याचा आर्थिक फटका बसतो. याचे भान शासनाने ठेवावे. – प्रदीप परूळेकर, उद्योजक.