अतिदक्षता कक्षांमध्ये दहाच खाटा उपलब्ध; रुग्ण झपाटय़ाने वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयेश सामंत/आशीष धनगर

ठाणे शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी अतिदक्षता कक्षातील व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. शहरातील १७ कोविड रुग्णालयांपैकी ९ रुग्णालयांमधील अतिदक्षता कक्षांची क्षमता पूर्ण झाली असून उर्वरित आठ ठिकाणी दहा खाटा उपलब्ध आहेत.

महापालिकेने बाळकूम भागात उभारलेले १२०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय देखील डॉक्टर आणि परिचारिकांच्या अभावामुळे जेमतेम ४० टक्के क्षमतेने सुरू असून तेथील अतिदक्षता कक्षातील २४ खाटा भरल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात रोज सरासरी ३५० ते ४५० नवे  रुग्ण आढळत आहेत. करोनावर उपचार करणारी शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालये भरू लागली आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील रुग्णांच्या संख्येने एव्हाना ९ हजारांचा टप्पा पार केला असून शहरात ४ हजार ३१६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत महापालिकेने एक सरकारी आणि १५ खासगी अशी एकूण १६ रुग्णालये केवळ करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ताब्यात घेतली आहेत. तसेच बाळकूम येथे १२०० खाटांचे नवे रुग्णालय उभारले आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी  विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. सध्या करोनाच्या रुग्णांसाठी एकूण ३ हजार ४३७ खाटा उपलब्ध आहेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही व्यवस्था अपुरी ठरू लागली आहे.

मनुष्यबळाची कमतरता

ठाणे महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि विकासकांच्या माध्यमातून बाळकूम येथे १२०० खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन आठवडय़ांपूर्वी त्याचे उद्घाटन करण्यात आले. पंधरवडा उलटूनही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. सद्य:स्थितीत या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात २४ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ७६ खाटा रिकाम्या आहेत. मात्र, वैद्यकीय कर्मचाऱ्यांअभावी रुग्ण दाखल करणे शक्य नाही, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. ठाण्यासह जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात एकही खाट उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील गंभीर रुग्णांपुढे संकट उभे राहिले आहे.

अतिदक्षता विभागातील उपलब्ध खाटा

कौशल्या रुग्णालय – १

वेदांत रुग्णालय – २

कालसेकर रुग्णालय – २

ठाणे हेल्थ केअर – १

स्वस्तिक रुग्णालय – ३

एकता रुग्णालय – १

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treatment of severe corona patients in thane abn
First published on: 05-07-2020 at 00:58 IST