कल्याण-शीळ-मुंब्रा रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल उभारणीसाठी प्रस्ताव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरातील उड्डाणपूल, रस्त्यांची उभारणी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रकल्पांसाठी गेल्या वर्षभरात हजारो वृक्षांवर कुऱ्हाड चालवल्यानंतर शीळ-कल्याण महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या रुंदीकरण प्रकल्पांसाठी तब्बल ८०० वृक्षांच्या कत्तलीचा नवा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाने तयार केला आहे. मुंब्रा वळणरस्ता ते कल्याण फाटा रस्त्यांच्या ६० मीटर रुंदीकरणासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून ५००पेक्षा अधिक वृक्ष कापण्यात येणार असून याच भागात दत्त मंदिर ते रिव्हरवूड पार्कपर्यंत कल्याण-शीळ रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ठाणे महापालिका २३१ वृक्षांचे पुनरेपण करणार आहे.

कल्याण-शीळ मार्गालगत उभ्या राहत असलेल्या बडय़ा बिल्डरांच्या विकास प्रकल्पांमुळे या भागातील वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, तळोजा अशा विवीध शहरांना जोडणारा मार्ग असल्याने या ठिकाणी दररोज वाढणाऱ्या वाहनांचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी महापालिका तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून विविध प्रकल्पांची आखणी केली जात आहे. प्राधिकरणाने मुंब्रा जंक्शन तसेच मुंब्रा जंक्शन ते शीळ कल्याण फाटा या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच उड्डाणपुलांच्या उभारणीचे प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून मुंब्रा जंक्शनवरील उड्डाणपूल तसेच रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी ८९ कोटी ५६ लाख १३ हजार रुपयांचे काम मेसर्स एस. एम. सी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुंब्रा बाह्यवळण जंक्शन ते शीळ जंक्शनपर्यंतचा ३० मीटर रुंदीचा रस्ता ६० मीटरचा करण्याची निविदाही मान्य करण्यात आली असून हे सुमारे ६७ कोटी रुपयांचे हे काम मेसर्स एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्याचे ठरवण्यात आले आहे. ही दोन्ही कामे मार्गी लागावीत यासाठी महापालिकेने डिसेंबर महिन्यात या भागातील दोन पक्क्या निवासी इमारतींसह इतर अतिक्रमणे काढून टाकली आहे. त्यातच आता या भागातील ८०० वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याची तयारीही सुरू झाली आहे.

वृक्षतोड सुरूच

  • कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उतारा शोधण्यासाठी या रुंदीकरण प्रकल्पांशिवाय पर्याय नाही, असे कारण पुढे करत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने येथील सुमारे ५५० वृक्षांच्या तोडीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेकडे सादर केला आहे. यापैकी ६९ वृक्षांचे पुनरेपण केले जाईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे.
  • एमएमआरडीएचे प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे असतानाच महापालिकेने कल्याण-शीळ रस्त्यावर दत्त मंदिर चौकापासून रिव्हरहूड पार्कपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • मुंबईस्थित एका मोठय़ा बिल्डरची याच मार्गावर विशेष नागरी वसाहत उभी असून त्यामुळे कल्याण-शीळ मार्गाच्या रुंदीकरणासाठी ही मंडळी कमालीची आग्रही आहेत. ठाण्यात रस्ता रुंदीकरणाची मोहीम धडाक्यात राबवणाऱ्या महापालिकेने हा आग्रह मनावर घेत शीळ फाटा ते रिव्हरहूड पार्कपर्यंतचा रस्ता रुंद करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी २३१ वृक्षांची कत्तल केली जाणार असून पुनरेपणही केले जाईल, असा दावा वृक्ष प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree cutting for development work road development
First published on: 08-06-2017 at 01:50 IST