लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा-भाचे डोंगरावर लागलेल्या आगीत ठाणे महापालिकेने काही वर्षांपुर्वी लागवड केलेली झाडे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहेत. या परिसरात अनेक गर्दुल्ले आणि अनधिकृतपणे राहणारे लोक नशा करत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावल्याचा संशय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी व्यक्त केला असून या दुर्घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.

ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग परिसर येतो. या उद्यान परिसरातील मामा-भाचे डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या डोंगरावर दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली. या आगीत शेकडो झाडे भस्मसात झाली आहेत. ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली होती, मात्र या आगीत वनसंपदा उद्ध्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे ही आग लागली नसून कोणी तरी जाणीवपूर्वक लावल्याचा संशय संदीप पाचंगे यांनी व्यक्त केला आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात मोडत असून, येथे अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मामा-भांजे डोंगर परिसरात अनेक गर्दुल्ले आणि अनधिकृतपणे राहणारे लोक नशा करत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. याबाबत अनेक वेळा वनविभागाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

वनविभागाच्या सुमारे १२०० चौरस मीटर जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल केला, मात्र राजकीय दबावामुळे कारवाई पूर्णत्वास जाऊ शकली नाही. परिणामी, या भागातील अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झालेला दिसून येत असल्याचा आरोपही पाचंगे यांनी केला आहे. वनविभागाच्या अहवालानुसार, मामा-भांजे दर्ग्याच्या शेजारी नव्याने उभारण्यात आलेले ४०० चौरस मीटरचे कब्रस्तान अधिकृत नाही. ठाणे शहराच्या हद्दीत कब्रस्तानाच्या सुविधांची कमतरता असल्यास, त्याचा उपाय शोधण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात अनधिकृत कब्रस्तान उभारले जाणे कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका – वायुसेनेची तक्रार

एअर फोर्स स्टेशनच्या जवळच असलेल्या कान्हेरी हिल परिसरातील मामा-भांजे दर्ग्याच्या आसपास काही अनोळखी लोक स्थलांतरित झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनीही या संदर्भात पत्राद्वारे तक्रार नोंदवली होती. राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत होणारी अनधिकृत वसाहत आणि वाढती लोकसंख्या सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे, असेही पाचंगे यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ठाणे शहरासाठी एक अनमोल ठेवा आहे. निसर्गसंपत्तीचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे अनधिकृत बांधकामे वाढत आहेत आणि आता या आगीसारख्या घटनांमुळे संपूर्ण निसर्ग धोक्यात आला आहे. वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी. -संदीप पाचंगे, सरचिटणीस, मनविसे