ठाणे : मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गावरील मुंब्रा देवी मंदिर परिसरात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तेलाचा टँकर उलटल्याची घटना उघडकीस आली आहे. भर रस्त्यात टँकर उलटल्याने तसेच टँकरमधील तेल रस्त्यावर सांडल्याने ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने ही मार्गिका बंद केली होती.
ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उरण जेएनपीटी येथून भिवंडी गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही या मार्गिकेवरून होत असते. हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तेलाचा टँकर बाह्यवळण मार्गावरील मुंब्रा देवी मंदिराजवळ एका दुभाजकाला धडकल्याने टँकर भर रस्त्यात उलटला. तसेच त्यामधील तेल रस्त्यावर सांडले. याचा परिणाम येथील वाहतुकीवर झाला. त्याच वेळी एक ट्रकही या मार्गिकेवर बंद पडला. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.
सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी ही मार्गिकाच बंद केली होती. त्यामुळे या मार्गिकेवरून वाहतूक करणाऱ्या काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने म्हणजेच, ठाण्याहून शिळफाटाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु या मार्गिकेवरही दोन वाहने बंद पडली. त्याचा परिणाम या मार्गिकेवर होऊन मुंब्रा देवी मंदिर ते खारेगाव टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्ग बंद झाल्याचे चित्र होते.
शिळफाटा, नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर मुंब्रा देवी मंदिर ते कौसापर्यंत तसेच ठाण्याहून शिळफाटा येथे वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर मुंब्रा देवी मंदिर ते खारेगाव टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी दुपारी बंद पडलेली वाहने तसेच टँकर, क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले. परंतु दुपारी चारनंतरही वाहतूक कोंडी कायम होती.
या वाहतूक कोंडीमुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. वाहनचालकांना दुपारी भर उन्हात कोंडीत अडकून राहावे लागले. कार, दुचाकीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सर्वाधिक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
मुंब्रा बाह्यवळण मार्ग हा नवी मुंबई, उरण, शिळफाटा, कल्याण- डोंबिवलीहून या वाहतूक कोंडीमध्ये जड-अवजड वाहनांसह अनेक दुचाकीस्वार, कारचालक अडकले होते. भर उन्हात दुचाकीस्वारांचे हाल झाले. वाहतूक पोलिसांनी तासाभराने अथक प्रयत्न करून परिसरातील बंद पडलेली वाहने रस्त्याच्या बाजूला केली. त्यामुळे ठाण्याहून शिळफाटाच्या दिशेकडील वाहतूक काहीशी सुरळीत झाली होती, तर दुपारी ३ वाजेच्या सुमारास उलटलेला टँकर रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला. त्यामुळे तब्बल दोन तासांनंतर शिळफाटय़ाहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका सुरू करण्यात आली. असे असले तरी वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा भार वाढलेला होता.
वळसा घालून प्रवास
मुंब्रा बाह्यवळण मार्ग ठप्प झाल्याने वाहतूक पोलिसांनी मुंबई नाशिक महामार्गाहून शिळफाटा येथे वाहतूक करणाऱ्या काही वाहनचालकांना ठाणे- बेलापूर मार्गे सोडण्यात आले. त्यामुळे शिळफाटा, महापेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना वळसा घालून प्रवास करावा लागला.
मुंबई-नाशिक महामार्गावरही परिणाम
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे खारेगाव टोलनाका येथपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे त्याचा काहीसा परिणाम मुंबई नाशिक महामार्गावरही झाला होता. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका ते मानकोली पुलापर्यंत कोंडी झाली होती.
