बदलापूर : बदलापुरसह आसपासच्या शहरातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणाऱ्या कल्याण बदलापूर दरम्यानच्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेचे ३० टक्के काम पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यात कामात ५ टक्केच प्रगती झाली आहे. लोकल गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि विना थांबा प्रवासासाठी या मार्गिका महत्वाच्या आहेत. या कामाला गती देण्याची मागणी आता होते आहे. या मार्गिकांचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जातो आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारे प्रकल्प संथगतीने सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यात कल्याण पल्याडच्या कल्याण बदलापूर तिसऱ्या चौथ्या मार्गिकेचे काही वेगाने पूर्ण होण्याची गरज प्रवाशांमधून व्यक्त होते आहे. कल्याण पल्याड अंबरनाथ, बदलापूर ते थेट कर्जतपर्यंत दोनच मार्गिका आहेत. याच मार्गिकेवरून लोकल गाड्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही प्रवास चालतो. कल्याण रेल्वे स्थानकात अनेकदा लोकल गाड्या नियोजीत थांब्यापेक्षा अधिक काळ थांबवल्या जातात. त्यात दोनच मार्गिका असल्याने नव्या लोकल गाड्या सुरू करण्यात अडचणी येतात.
सध्याच्या घडीला या मार्गिकांचा १०० टक्क्यांहून अधिक वापर सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नव्या लोकल गाड्या किंवा लहान पल्ल्याच्या अर्थात कल्याण ते कर्जत लोकलगाड्या सुरू करता येत नाहीत. परिणामी कमी अंतराचा प्रवास करू इच्छीणारे प्रवासीही एकाच लोकलने प्रवास करतात. त्यात गेल्या काही वर्षात कल्याणपल्याड अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ या भागात गृहसंकुलांची संख्या वाढली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी येथे स्थलांतर केले आहे. पर्यायाने रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. मात्र या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्वाची असलेली कल्याण ते बदलापूर तिसरी चौथी मार्गिका संथगतीने सुरू आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या टप्पा तीन अ मधील या कल्याण बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम ३० टक्के पूर्ण झालेले आहे. सुमारे १ हजार ५०१० कोटी रूपये खर्चातून हा प्रकल्प मार्गी लावला जातो आहे. यात पाच स्थानके आणि ५१ पुलांचे काम केले जाणार आहेत. काही उड्डाणपुलांची कामे सुरू असून काही पूर्ण करण्यात आली आहेत. विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथे बांदकामे सुरू आहेत. विठ्ठलवाडी स्थानकातील फलाटांची लांबी वाढवण्याचे कामही सुरू आहे, अशी माहिती उदासी यांनी दिली आहे.
प्रतिक्रिया
तिसऱ्या चौथ्या मार्गिकेचे काम वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे कल्याणपल्याडच्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. तर कल्याणपासून पुढे बदलापूर आणि टिटवाळ्यापर्यंत १५ डब्ब्यांची लोकल सुरू करणेही गरजेचे आहे. मनोहर शेलार, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.